सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत पुष्करसिंह पेशवे (सरकार) होते. या वेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, श्रीमंत राजलक्ष्मी पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे-गुरुजी, विश्राम कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गणपती मंदिर परिसरातील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मंत्र पुष्पांजलीच्या वर्षावात आदित्यराजे पटवर्धन यांचे स्वागत करून त्यांना पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते राजवस्त्र बहाल करण्यात आले.
खासदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी इथे सत्कार घ्यायला आले नाही तर जिथे आपल्याला त्रास होत असेल तेथे ब्राम्हण समाजाने व्यक्त झाले पाहिजे, हे सांगायला आले आहे. आपल्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळी टीका होते. आपल्याबद्दल नकारात्मकतेची भावना असते. ती नकारात्मकता आपल्या वर्तणुकीतून नाहीशी करण्याचा प्रयत्न करणे हे आपले काम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, संत एकनाथ यांनी स्वतःसाठी काम केले नाही. त्याप्रमाणेच आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे न्यायचे आहे. देशभरातील सर्व जातीतील हिंदूंना एकत्रित करायचे आहे.’
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांची नियुक्ती झाली. पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून त्या माजी आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध ६४ हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासूनच विधानपरिषद असो वा राज्यसभा, प्रत्येक वेळी मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन कुठे होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहायचं. मात्र यंदा मार्च महिन्यात त्यांना संधी मिळाली.