अपघाताचा आळ स्वत:वर घे, पैसे देतो! मुलाला वाचवण्यासाठी चालकाला देण्यात आलेली ऑफर

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी खळबळजनक माहिती दिली आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी चालक कार चालवत असल्याचं भासवलं गेलं. त्याला गोवण्याचा प्रयत्न झाला. अपघातानंतर चालकांची अदलाबदल झाली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.

‘सुरुवातीला चालकानं आपणच कार चालवत असल्याचा दावा केला होता. त्यानं दिलेल्या जबाबावरुन तपास सुरु केला. कोणाच्या दबावाखाली त्यानं चालकानं तो जबाब दिला ते आम्ही तपासत आहोत. अपघातानंतर चालकांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही त्याचीही चौकशी करत आहोत,’ असं कुमार यांनी सांगितलं. अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार १७ वर्षीय मुलगाच चालवत असल्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत, असं कुमार म्हणाले.
Dombivli Blast: लेकासाठी घेतलेला निर्णय जीवावर बेतला; डोंबिवली स्फोटात आई गेली, अंगठीमुळे ओळख पटली
‘आमच्याकडे पबमधील सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यात आरोपी मुलगा दारु पिताना दिसत आहे. आमचा तपास ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. तो मुलगा शुद्धीत होता. ते सगळं दारुच्या नशेत होते, आपण काय करतोय याची त्यांना जाणीवच नव्हती, अशी स्थिती नव्हती. अपघात होऊ शकतो. त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव त्यांना होती,’ असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

पुणे पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाच्या पालकांनी चालकाला या अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितलं. त्याबदल्यात त्याला पैशांची ऑफर देण्यात आली. शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात २ अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला. कार चालवणारा आरोपी अल्पवयीन आहे. अपघातग्रस्त कारला नंबरप्लेट नव्हती. तिची नोंदणी आरटीओकडे झालेली नाही.