मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून या मतदारसंघातून माजी मंत्री अनिल परब यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेंनी सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास महाविकास आघाडीकडून अनिल परब विरुद्ध महायुतीकडून डॉ. दीपक सावंत असा सामना विधान परिषदेवरील मुंबई पदवीधर मतदारसंघात रंगेल.
खरंतर दीपक सावंत हे खासदारकीसाठी उत्सुक होते. शिवसेनेकडून उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा होती. उमेदवार मिळत नसल्यास आपण मैदानात उतरु, अशी मनिषाही त्यांनी बोलून दाखवली होती.
कोण आहेत दीपक सावंत?
डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेवरील मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार आहेत. २००६ आणि २०१२ असे सलग दोन वेळा ते शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र २०१८ मध्ये त्यांना तिसऱ्या टर्मची संधी नाकारण्यात आली. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर भंडारा आणि धाराशिवचे पालकमंत्रिपदही सुपूर्द करण्यात आलं होतं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
निरंजन डावखरेंना पुन्हा संधीची चिन्हं
दुसरीकडे, कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत. २०१२ मध्ये निरंजन हे राष्ट्रवादीकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर गेले होते. २०१८ च्या विधानपरिषद निवडणुकांआधी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघाचे तिकीट मिळाले. त्यांना भाजपकडून दुसऱ्या टर्मची संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ते ठाणे भाजपचे प्रमुख असून त्यांच्या अखत्यारित ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे भाग येतात. निरंजन डावखरे हे वडिलांप्रमाणेच सर्वपक्षीय सुमधुर संबंध जपण्यात कुशल मानले जातात. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक जड जाण्याची शक्यता नाही.