विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. त्यात विधानसभेच्या रणनीतीवर मंथन करण्यात आलं. तसंच मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी द्यायची यावर प्राथमिक चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना मंत्रिमंडळ विस्तार करून आमदारांना संधी देऊन काही प्रमाणात का होईना त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा युतीत समावेश झाल्यामुळे मंत्री होण्याची संधी हुकलेल्या नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. विशेषतः काही नवीन चेहऱ्यांना यामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या आमदारांची यादी-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट
1) मकरंद आबा पाटील
2) विक्रम काळे
3) संग्राम जगताप
शिवसेना शिंदे गट
1) भरत गोगावले
2) संजय शिरसाठ
3) प्रताप सरनाईक
भाजप
1) देवयानी फरांदे
2) माधुरी मिसाळ
3) संजय कुटे
सध्या बऱ्याच मंत्र्यांकडे अधिक खात्यांची जबाबदारी असल्यानं त्यांना त्या विभागांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या कुठल्या आमदाराला मंत्रिपद मिळेल याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होईल याबाबत सध्या नेमकं सांगता येणार नाही, असं एका आमदारानं खाजगीत सांगितलं. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही त्यांची महामंडळावर नियुक्ती करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.