आमचा पराभव संशयास्पद, न्यायालयात जाणारच
अनिल परब म्हणाले, हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी निकाल दिला हे जगजाहीर आहे. मुंबई उत्तर पश्चिममधला आमचा पराभव संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात जातो आहोत. त्याआधी मतमोजणीवेळी नेमके काय झाले होते हे जनतेला कळावे, म्हणून आजची पत्रकार परिषद घेत आहोत.
आमच्या प्रतिनिधींच्या मतांमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मतांमध्ये जवळपास ६५० मतांचा फरक
“मतमोजणीदिवशी १८ व्या फेरीपर्यंत सगळी प्रोसेस नियमाप्रमाणे सुरू होती. मात्र १९ व्या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतांची मोजणी जाहीरपणे सांगण्याचे थांबवले. एवढेच नव्हे तर निकाल जाहीर करण्याआधी आम्हाला वेळ होत असल्याचे सांगत आक्षेपाची संधीही दिली नाही. खरेतर कायद्यानुसार दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना आक्षेपाची संधी असते. मात्र अशी संधी न देता त्यांनी घाईघाईने निकाल जाहीर केला. विशेष म्हणजे आमच्या प्रतिनिधींच्या मतांमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मतांमध्ये जवळपास ६५० मतांचा फरक होता. १९ ते २३ व्या फेरीदरम्यानची ही मते असू शकतील”, असे अनिल परब म्हणाले.
अधिकाऱ्यांना सतत कुणाचे फोन येत होते?
पुढे बोलताना परब यांनी अनेक धक्कादायक दावे केले. ते म्हणाले, “मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकपणे केली गेली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव होता. त्यांना सारखे फोन येत होते. त्यामुळे त्या खुर्चीवरून उठून बाहेर जात होत्या. त्या संपूर्ण दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज, आम्हाला मिळावे, अशी आमची मागणी आहे. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालयीन रेकॉर्ड चांगले नाही. त्यांच्यावर याआधी बऱ्याच केसेस आहेत. संबंधित अधिकाऱ्याचा पूर्वइतिहास हा भ्रष्टाचाराचा राहिलेला आहे. त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा विजय सरकारी यंत्रणांचा वापर करून हिरावून घेतलाय. पुढच्या २ दिवसांत आम्ही न्यायालयात जाऊ, परंतु आमची निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे की आपण स्युमोटो कार्यवाही करावी”.