अजित पवारांकडे सहा मतांची तूट, पाडणार काँग्रेसमध्ये फूट; दादांना तिघांकडून मतदानाची हमी?

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मतांचा कोटा आज निश्चित करणार आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईतील हॉटेल ललितमध्ये महत्त्वाची बैठक आहे. काँग्रेसमधील तीन, तर दोन अपक्ष आमदारांची मतं आपल्याला मिळण्याची खात्री राष्ट्रवादीला असल्यामुळे काँग्रेसमधले तीन गद्दार कोण, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादांकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सहा मतांची दादांना खात्री

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्वतःच्या आमदारांची ४० मतं आहेत, याशिवाय काँग्रेसमधील तीन मतं मिळण्याचीही अजितदादांना खात्री आहे. तसंच दोन अपक्ष आमदार पाठीशी असल्याची चर्चाही राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.

२३ मतांचा कोटा निश्चित

यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रत्येकी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडे ४० मतं असून त्यांना दोन उमेदवारांना विजयी करण्यासाठी आणखी सहा मतांची गरज आहे. काँग्रेसची तीन आणि अपक्ष दोन अशा पाच मतांची बेगमी झाल्याचा राष्ट्रवादीला विश्वास आहे.
Third Front : एकनाथ शिंदेंचा ‘भिडू’ फुटणार? विधानसभेला तिसरी आघाडी, बच्चू कडूंच्या साथीला कोण दोघे?
त्याशिवाय शेकापचे श्यामसुंदर शिंदे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचीही अजित पवारांनी भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांची मतंही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MLC Elections : विधान परिषद निवडणुकीत दगाफटक्याची भीती, भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, पण अंबानींमुळे बोंब

राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांची कालही मुंबईत एक बैठक झाली. आज आणखी एक बैठक होणार असून त्यात आमदारांना कशाप्रकारे मतदान करायचं, याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसंच प्रत्येकी किती मतांचा कोटा निश्चित करायचा, याविषयी अंतिम निर्णय होण्याची चिन्हं आहेत.

११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार असून १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस वाढली आहे. ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांनी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवलं आहे. नार्वेकरांची भिस्त काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर आहे. मात्र काँग्रेसची मतं जर राष्ट्रवादीकडे वळली, तर त्याचा फटका ठाकरेंना बसणार का, असा सवाल विचारला जात आहे.