अजितदादाचं नाही, हे माझ्या आशाकाकी-काकाचं घर, सुप्रिया सुळेंनी भेटीचं गुपित उलगडलं

बारामती: सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरू झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट स्वतंत्र झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

एकाच कुटुंबातील दोन परस्पर विरोधी उमेदवार उभे असल्याने हा मतदार संघ चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी निवासस्थानी भेट दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे या काटेवाडीच्या अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्याने बारामतीच्या राजकारणात ट्विस्ट पाहिला मिळाला. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होत असताना या भेटीमुळे राजकारणार एकच चर्चा सुरू आहे.

अजितदादांच्या घरी भेट दिल्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“हो हे माझ्या काका-काकीचं घर आहे. मतदानासाठी माझ्या कुटुंबातील अनेक नातेवाईक आले आहेत. त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आली आहे. अशाच भेटीगाठी मुळशीपर्यंत घेत जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

मात्र, मतदानाच्याच दिवशी सुप्रिया सुळे या अजितदादांच्या घरी गेल्याने ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे, असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पांडुरंगानंतर काका-काकू हे आपले आई-वडील असतात. त्यामुळे कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे. आई-वडिलांना राजकारणात आणायचं नाही.