अजितदादांनी १५ वर्षांचा हिशेब मागितला, सुप्रियाताईंनी १८ वर्षांचा हिशेब सांगत आरसा दाखवला!

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काल पुण्यात प्रचार करत असताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षात काय काम केलं असा सवाल विचारला आहे. याला आता सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

आम्ही सगळ्यांनी अठरा वर्षे एकाच पक्षात काम केले तर हे दादा विसरतात. कारण गेली साडे सतरा वर्षे आम्ही एकाच विचाराच्या पक्षात काम करत होतो. दिल्लीचा फॉलोअप असेल किंवा इथला फॉलोअप असेल तो एक टीम वर्क म्हणून आम्ही घेत होतो. दादा माझ्यापेक्षा पदाने, वयाने आणि नात्याने खूप मोठे आहेत. आणि माझ्यावर झालेल्या संस्कारानुसार आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या माणसाला फक्त आदरणीय सन्मान द्यायचा असतो. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
माढ्यात फडणवीसांची मोठी खेळी, धवलसिंहांना भेटणार, मोहिते पाटलांच्या घरात उभी फूट?
तर सुप्रिया सुळे यांच्या कामावरून टीका केलेल्या अजित पवारांनी आपला अहवाल पूर्ण वाचला नसेल असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात. ‘दादांनी कदाचित माझा अहवाल पूर्ण वाचला नसेल. भोरच्या एमआयडीसी बद्दल अजितदादा, मी, रणजित शिवतारे आणि संग्राम थोपटे आम्ही एकत्रित प्रयत्न करत आलो आहोत. भोरला एमआयडीसी आली तर स्वागतच आहे. माझ्या मतदारसंघात सर्वत्रच एमआयडीसी आहेत आणि त्यातल्या प्रत्येक फॅक्टरीचे उद्घाटन हे शरद पवार यांनीच केलेला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

बारामतीचा उमेदवार उशिरा जाहीर केल्याने सगळीकडे पोहोचू शकलेला नाही. मात्र, उमेदवार माझी बायको आहे म्हणून मतदान करा, असे मी म्हणत नाही. सध्याच्या खासदाराची पंधरा वर्षे आणि आमच्या उमेदवाराला निवडून दिले, तर पुढची पाच वर्षे याची तुलना केल्यास आमची पाच वर्षे उजवी असतील,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. ‘सध्याच्या खासदाराने पंधरा वर्षे काय केले याचा विचार करावा,’ असा सल्लाही त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता दिला होता.

कुंकू लावायचं असेल तर एकाचेच लावा, माझं तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा

आमच्या उमेदवाराने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी गाव पहिले आणले. विद्या प्रतिष्ठानचे कामही पाहिले. टेक्सटाइल पार्कमध्ये पाच हजार महिला काम करतात. सध्याच्या खासदाराला पंधरा वर्षे निवडून दिले; पण तुम्हाला काहीच मिळाले नाही. मी बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. मला विकास करायचा अनुभव आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याची आवड आहे. आमचा फायदा उठवायचा असेल, तर साथ द्या,’ असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले होते.