लोकसभा निवडणुकांमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी राज्यातील महिला जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची आणि अल्पसंख्याक सेल व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पार पडली.सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, उन्नतीसाठी ज्या-ज्या योजना अपेक्षित आहेत त्याचा आढावा दोन – चार दिवसात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव मागणी केली जाणार, असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचीही बैठक झाली. या बैठकीत तटकरे यांनी प्रवक्त्यांना आक्रमकरित्या पक्षाची भूमिका मांडण्याची सूचना केली.
लोकसभा निवडणुकीचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसेल अशी धास्ती बाळगण्याचे कारण नाही. अजित पवार अर्थमंत्री म्हणून उत्तम काम करत असून त्यांच्या कामाचा प्रचार पक्षाकडूनही व्हायला हवा. पण, इतर पक्षांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात वेळ दवडू नका. पक्षाचा जनाधार काही समाजांमध्ये घटला असला तरीही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तसेच त्यांच्यापासून अंतर वाढणार नाही याची माध्यमांत बोलताना खबरदारी घ्या, असे तटकरे म्हणाले. तर, विधानसभेच्या जागावाटपाबाबत दुसऱ्या पक्षांनी कितीही दावे केले तरीही त्याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नाही, पण जर कमरेखाली वार झाले तर त्याला चोख उत्तर द्या, असे तटकरे यांनी प्रवक्त्यांना सांगितले. मंगळवारी तटकरे यांनी पक्षाच्या सोशल मीडियाच्या समन्वयकांची बैठक घेतली. त्यानंतर अल्पसंख्याक सेलच्या विभागाचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.