अंधारे-धंगेकरांची एक्साईज कार्यालयात धडक; एसपींना कुठून किती हप्ता? अख्खी यादीच वाचली

पुणे: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या पोर्शे अपघातानंतर आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे या दुर्घटनेवरुन सतत पुणे पोलिस आणि प्रशासनावर टीका करत आहेत. तर आज रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट पुण्यातील एक्साईजच्या कार्यालयावर मोर्चा नेला.पुण्यातील पबला उत्पादन शुल्क विभाग जबाबदार आहे असा आरोप धंगेकर आणि अंधारे यांनी यावेळी केला. तसेच, यावेळी त्यांनी बनावट नोटांनी भरलेला बॉक्सही उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेला. तसेच, त्यांनी एसपींच्या कार्यालयात जात त्यांना याविषयी जाब विचारला.

तुम्हाला लाज कशी वाटत नाही, रवींद्र धंगेकर एक्साईजच्या एसपींवर बरसले

कार्यालयात जाताच रवींद्र धंगेकर यांनी सोबत आणलेली कागदपत्र काढली आणि त्यातून एक्साईजच्या एसपी चरणसिंग राजपूत यांना कुठून किती किती हप्ता मिळतो याची यादीच वाचून दाखवली. जेव्हा अधिकाऱ्याने सांगितलं की हे सारं खोटं आहे, तेव्हा मात्र धंगेकर संतापले. तुम्ही स्वत:ला समजता काय, मी एक आमदार म्हणून बोलतोय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे सांगायला की खोटं आहे, तुमच्याकडे कुठून आणि कशे पैसे येतात याची यादी आहे माझ्याकडे, असं धंगेकर म्हणाले.
Pune Accident: आठवडाभर ब्लड रिपोर्ट नाही तेव्हाच संशय, त्या रात्री अनेकांनी ईमान विकले; धंगेकर संतापले
तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, आता आम्ही तुम्हाला चांगल्याने सांगायला आलो आहोत. यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्या पोलिसांनी काय कारवाई करायची ती करु द्या. पण, यापुढे पुणेकरांना आंच्या मुलांना काही होऊ देणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही.

या यादीमध्ये कुठून साडे पाच लाख, कुठून १ लाख तर कुठून ५००००, कुठून ९०००० तर कुठून ५००० हप्ता येत असल्याचा उल्लेख आहे. हा अख्खी यादी सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली.

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळू नका, अंधारे संतापल्या

उत्पादन शुल्क विभाग काय करतं. जर महिन्याला ड्रग्ज सापडत असेल तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार जे मंत्री आहेत त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? या देशाच्या भविष्यासोबत तुम्ही खेळताय, असंही त्या म्हणाल्या. तसेच, जर पैशांसाठीच हे सारं चाललं असेल तर आम्ही आमच्या अंगावरचे दागिने विकतो आणि देतो तुम्हाला. पण पुणेकरांच्या आरोग्याशी खेळू नका असं म्हणत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला.

जर हे पब बेकायदेशी होते ते परवानगी कशी मिळाली, महापालिकेने जर परवानगी दिली नाही तर पब कसे सुरु होते. कोट्यवधींचा हफ्ता हे लोक घेतात, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.