हृदयाच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता हृदयप्रत्यारोपण सुरू करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय चमूची आवश्यकता होती. त्यासाठी हृदयविकारासंबंधी तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. उदय जाधव, डॉ. द्वारकानाथ कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. तरुण शेट्टी यांच्यासह ५० जणांच्या चमूने हे आव्हान पेलले.
ब्रेनडेड महिलेच्या कुटुंबाचा अवयवप्रत्यारोपणाचा निर्णय
कल्याणमधील पत्रीपूल येथे राहणाऱ्या दीपक परब यांची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कल्याणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना केईएममध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यांना कावीळ झाली होती, तसंच मेंदूमध्ये रक्तस्त्रावही झाला होता. प्रसुती करावी की, शस्त्रक्रिया असा पेच डॉक्टरांपुढे होता. बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्यास यश आले नाही. त्यांना १० जुलैला डॉक्टरांनी मेंदूमृत जाहीर केले. डॉक्टरांनी परब यांना सर्व माहिती देऊन अवयवदान करण्याचा सल्ला दिला. खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असलेल्या परब यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंबाच्या सल्ल्याने अवयवप्रत्यारोपण करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली.
औरंगाबाद येथील हृदयविकार असलेल्या रुग्णाला हृदयप्रत्यारोपणाची गरज होती. ते प्रतीक्षा यादीत होते. आठ ठिकाणांहून त्यांना हृदयाच्या उपलब्धतेसाठी केईएम रुग्णालयामध्ये विचारणा झाली होती. कधी चाचण्या तर कधी रक्तगट जुळून येत नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते. अखेर कल्याणमधील महिला आणि या हृदयविकार रुग्णाच्या चाचण्या योग्यरितीने जुळून आल्यानंतर हृदयप्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेंदूमृतावस्थेमध्ये असलेल्या या महिलेच्या हृदयाप्रमाणे दोन्ही नेत्रपटलाचेही दान करण्यात आले. या नेत्ररुपी दानामधून नेत्रपटलाची गरज असलेल्या गरजू रुग्णाला नवदृष्टी मिळाली.
सात लाख रुपयांचा खर्च
खासगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, केईएम रुग्णालयामध्ये त्यासाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आला. ‘ओपन हार्ट सर्जरी’ या गटामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण पूर्णपणे लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यंत कमी खर्च येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
१९६८ पहिली हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, आता ४० बैठकांनंतर निर्णय
केईएम रुग्णालयामध्ये १६ फेबुव्रारी १९६८ रोजी पहिल्यांदा हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही. देशातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये केईएमचे नाव घेतले जात असताना अशा शस्त्रक्रिया रुग्णालयाने का करू नयेत, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी डॉक्टरांना विचारला. डॉक्टरांच्या अडचणी समजून घेत त्यातून तोडगा काढण्यासाठी गेल्या सात महिन्यांत या विषयासंदर्भात जवळपास ४० बैठका घेण्यात आल्या. डॉक्टरांचे मनोबल वाढल्यानंतर यासाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, शस्त्रक्रिया विभागाची सुसज्जता करण्यात आली. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या पुढाकारामुळे केईएममध्ये हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या, असे केईएम प्रशासनाने सांगितले. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी केईएम रुग्णालयाला तात्पुरता परवाना मिळाला. त्यानंतर डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
अवयव प्रत्यारोपणासारख्या वैद्यकीय सुविधांचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळायला हवा. त्याच उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आला. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, दात्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने हे आव्हान पेलणे शक्य झाले, असं सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले.
हे आव्हान सांघिकरित्या पार पाडले. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. उदय जाधव, डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्यासह आमच्या पूर्ण चमूने केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. तो रुग्ण काही महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये होता. त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना थांबण्याची विनंती आम्ही केली होती. त्या प्रयत्नांना यश आले, असल्याचं केईएम रुग्णालय अधिष्ठाता, डॉ. संगीता रावत म्हणाल्या.