३७ लाखाच्या बैलावरुन झालेला गोळीबार जीवावर, बारामतीतील रणजीत निंबाळकरचा अखेर मृत्यू

पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैल खरेदी विक्रीच्या वादावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. निंबाळकर यांच्या मृत्यू बरोबरच त्यांच्या दहा महिन्यांच्या मुलीचे पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील निंबूत येथे काल रात्री अकराच्या सुमारास बैल खरेदी-विक्री झालेल्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गौरव काकडे याने डोक्यात गोळी झाडली होती. उपचारादरम्यान आज निंबाळकर यांचा मृत्यू झाला.

बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार

बारामती तालुक्यातील नींबूत येथील गौतम शहाजी काकडे यांच्या घरी बैलाच्या पैशांच्या व्यवहारावरून गौतम काकडे यांचा भाऊ गौरव काकडे याने फलटण येथील सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात लागल्याने निंबाळकर हे जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व नंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
Vidhan Parishad : मतांची जुळवाजुळव, विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाची उडी, बिनविरोध निकालाची शक्यता धूसर

जखमीचा आज उपचारादरम्यान मृत्यू

आरोपी गौतम काकडे यांना फिर्यादीचे पती रणजीत निंबाळकर यांनी ‘सुंदर’ नावाचा बैल ३७ लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम २७ जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबूत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची दहा महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते. या व्यवहारातून झालेल्या वादातून निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली होती.