आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. ज्या धारावीतून मी ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले, ते पद मला आज आयुष्याच्या एका नव्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सोडावे लागत आहे. आज संसदेच्या सदस्यत्वाच्या नियमांचे पालन करून मी धारावीच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
धारावी माझ्यासाठी मतदारसंघ नसून परिवार
आज मी जी काही आहे, ती याच धारावीमुळे… माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला धारावीनेच आपला स्नेहभाव आणि पाठबळ देऊन आज या यशाच्या शिखरावर आणून बसवले आहे. धारावी हा माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब माझ्या धारावी परिवाराशी कायमच जोडलेले राहू, असा शब्द त्यांनी धारावीकरांना दिला.
धारावीकरांच्या हक्काच्या लढ्यात मी कायम सहभागी असेन
गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील हे मी आवर्जून सांगू इच्छिते. धारावी आपल्या सर्वांची आहे, ती कोणाच्याही स्वार्थापुढे झुकू देणार नाही. धारावीकरांच्या हक्काच्या या लढ्यात मी आणि माझे कुटुंब नेहमीच सहभागी होतो, आहोत आणि राहणार. आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि नक्कीच जिंकू, असा विश्वासही त्यांनी धारावीकरांना दिला.
माझ्यासोबत तुम्ही कायम राहाल ही अपेक्षा
मला सदैव भक्कम साथ आणि पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या धारावी कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि गायकवाड कुटुंबियांवर कायम राहतील, असा विश्वास आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.