पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजी अलीजवळ मिहीरने ड्रायव्हरसोबत सीट बदलली आणि स्वत: गाडी चालवायला घेतली. प्राथमिक चौकशीत आरोपी मिहीर शहाने ड्रायव्हिंग सीटवर असल्याची कबुलीही दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीरने गुन्ह्याची कबुली नक्कीच दिली, तरी कबुलीजबाबात त्याने सुटकेचा दरवाजा खुला ठेवला आहे.
मी खूप घाबरलो होतो – मिहीर शहा
मिहीर शहाने दिलेल्या जबाबानुसार, अपघातानंतर तो खूप घाबरला होता. घरचे त्याला रागावतील अशी भीती त्याला वाटत होती, त्यामुळे वडील वांद्र्याला पोहोचण्यापूर्वीच तो तेथून निघून गेला. मात्र घरी जाण्याऐवजी तो गोरेगावला आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला.
सध्या पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मिहीरला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस पुढील तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.
मुंबईतील वरळी येथे झालेल्या भीषण BMW अपघाताच्या जवळपास ६० तासांनंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी मुख्य आरोपी मिहीर शहा याला शहापूर येथून अटक केली. सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर रविवारी (७ जुलै) झालेल्या अपघातानंतर फरार झाला होता. त्या दिवशी पहाटे त्याने आपल्या बीएमडब्ल्यूने नाखवा दाम्पत्याला धडक दिली होती. यामध्ये कावेरी नाखवा (४५) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात आता मिहीरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.