मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या सातत्याने उच्च प्रदूषण नसलेल्या शहरांमध्येही मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. या १० शहरांमधील नागरिकांचा पीएम २.५ या प्रदूषकाशी आलेला संबंध आणि २००८ ते २०१९ या काळात दररोज होणारे मृत्यू या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारत (सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबरेटिव्ह, अशोका युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर क्रोनिक डिसीझ कंट्रोल), स्वीडन (कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट), अमेरिका (हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टन युनिव्हर्सिटी) इत्यादी शैक्षणिक संस्थांमधील विविध संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. हवेच्या प्रदूषणाशी आलेला अल्पकालीन संपर्क आणि भारतातील मृत्यू यांच्यातील संबंधांच्या मूल्यमापनासाठी करण्यात आलेला हा पहिला बहुशहरी अभ्यास आहे. यात कारणात्मक प्रारुप तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कचरा जाळणे, वाहनांमधून होणारे उत्सर्जन या स्थानिक स्रोतांमुळे वाढणाऱ्या हवा प्रदूषणाचा प्रभाव मांडणे शक्य झाले. मुंबईमध्ये २००८ ते २०१९ या कालावधीत झालेल्या एकूण मृत्युंपैकी ५.६ टक्के मृत्यूंसाठी अल्पकालीन पीएम २.५ शी आलेला संपर्क कारणीभूत होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘दुप्पट प्रयत्नांची आवश्यकता’
या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेचे राष्ट्रीय पातळीवरील नियम अधिक कठोर करणे गरजेचे आहे आणि हवेच्या प्रदूषणाची पातळी नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न दुपटीने वाढविण्याची आवश्यकता आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वर्षातून केवळ काही वेळा उपाययोजना करण्यापेक्षा वर्षभर कार्यवाही करणे आवश्यक आहे. हवा प्रदूषणाच्या विविध स्थानिक स्रोतांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणात्मक साधने विकसित करणे आवश्यक आहे. तसे केल्यास आरोग्यासाठीचे शाश्वत लाभ मिळू शकतात, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.