पुणे : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तसेच प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभेतून देखील सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी बॅकफूटला गेले आहेत. पुढील तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅकफूटला जाणे पक्षाच्या भविष्यासाठी चांगले नाही, हे गृहित धरून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात आघाडीचा १५ वर्षांचा सत्ताकाळ तसेच यूपीएमधील १० वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर पक्षासमोर भाजपच्या उदयानंतर काहीसे कठीण प्रसंग उभे ठाकले. पण त्या ही प्रसंगातून सावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने यशस्वी वाटचाल केली. अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही १० पैकी ८ जागा जिंकून खरी जनतेच्या न्यायालयात ‘राष्ट्रवादी आपलीच’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेसला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. अजित पवार यांच्या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन साजरे होत आहेत. वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याचा ठराव केला.
Sharad Pawar: पवार है तो मुमकिन है! पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली
मानकर आणि देशमुख यांचं अजित पवार यांना पत्र
आदरणीय दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात यावे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल. तरी कृपया वरील ठरावाचा आपणाकडून विचार व्हावा, ही नम्र विनंती.
‘एका पराभवाने आपण संपलो असे नाही.पराभवातून बाहेर या. नाराजी झटका आणि विधानसभा निवडणुकीसह आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. परंतु पराभवाचा जबर धक्का बसल्याने कार्यकर्ते नैराश्यातून बाहेर येण्यास तयार नाहीयेत. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षातील सुस्तपणा परवडणारा नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याचा ठराव वर्धापनदिनी केला.