प्रतिनिधी, मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तूल आणि ३८ काडतुसे पुरविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. सोनू सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) अशी या आरोपींची नावे असून त्यांची पंजाब येथून धरपकड करण्यात आली. या दोघांच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.वांद्रे येथे सलमानचे वास्तव्य असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दुचाकीवरून आलेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी १४ एप्रिल रोजी गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून गुजरात येथून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तूल आणि सुमारे १७ काडतुसे पोलिसांनी पाणबुड्यांच्या साह्याने सुरतनजीक तापी नदीतून शोधून काढली. या गुन्ह्यात अन्य काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती आणि त्यानुसार इतर आरोपींचा शोध सुरू होता.
गोळीबार करणाऱ्या दोघांना १५ मार्च रोजी पनवेल येथे पिस्तूल देण्यात आली होती. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिस ही शस्त्रे पुरविणाऱ्यांच्या मागावर होते. आरोपींची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे बिश्नोईच्या गावातूनच ही शस्त्रे आल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक हे पथकासह पंजाबमध्ये पोहोचले. पोलिसांच्या पथकाने सोनू आणि अनुज या दोघांना ताब्यात घेतले. अनुज याच्यावर गुन्हे दाखल असून तो बिश्नोईसोबत थेट संपर्कात होता.

पोलिस कोठडीत वाढ
विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांची कोठडी संपत असल्याने दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार केल्यानंतर या दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तीनवेळा कपडे बदलले. या दोघांनी गुन्ह्यादरम्यान तीन मोबाइलचा वापर केला त्यापैकी एक मोबाइल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या गोळीबारामागील नेमका हेतू काय, याचा तपास करायचा असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने या दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.