सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीच करावी लागेल; संघाचा भाजपला सल्ला, बैठकीत काय काय चर्चा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसला. भाजपच्या लोकसभेच्या जागा २३ वरुन थेट ९ वर घसरल्या. विधानसभेची निवडणूक आता अवघ्या ४ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. राज्यातील सत्ता टिकवायची असल्यास अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील, असं संघाकडून भाजप नेत्यांना सांगण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते आणि राज्यातील मंत्र्यांनी पुण्यातील संघ कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट लोकसभेतील पराभवाबद्दल चिंतन केलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीनं ३० जागांवर बाजी मारली. पक्षाच्या नेतृत्त्वानं आणि संघानं महायुतीच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यातील सद्यस्थिती भाजपसाठी सकारात्मक नसल्याचं संघानं भाजप नेत्यांना सांगितलं.
Chhagan Bhujbal: बड्या नेत्यासोबत बैठक, दोन जागांचा आग्रह; भुजबळ घरवापसीच्या तयारीत, अजितदादांची साथ सोडणार?
‘लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा विधानसभा मतदारसंघांनुसार विचार केल्यास महाविकास आघाडी १५० मतदारसंघांमध्ये पुढे आहे. तर एनडीएला १३० जागांवर आघाडी आहे. राज्यातील ट्रेंड बदलण्याची शक्यता कमी आहे. लोकसभेला असलेला नरेंद्र मोदी फॅक्टर विधानसभेवेळी नसेल. त्यामुळे भाजपला मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील. तरच राज्यात कमबॅक करता येईल,’ असं संघाच्या पदाधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
Chhagan Bhujbal: भुजबळांची ‘समता’ खेळी, नेमकी कोणावर कुरघोडी? मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार?
भाजपची मातृसंस्था असल्यानं आम्ही सल्ले देऊ शकतो. पण त्यांची अंमलबजावणीची जबाबदारी भाजपकडे जाते, असं पदाधिकारी पुढे म्हणाला. ‘संघाचं मुख्यालय महाराष्ट्रात (नागपुरात) आहे. पण इथली परिस्थिती गुजरात, मध्य प्रदेशसारखी नाही. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत. त्यामुळे सगळ्यांना हिंदुत्त्वाच्या छताखाली आणणं संघासाठी अवघड काम आहे’, असं सांगत त्यांनी संघाच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

हिंदुत्त्वाच्या अजेंड्यासोबतच आम्हाला सोशल इंजिनीयरिंग करावं लागेल. भाजपचा हक्काचा मतदार असलेला ओबीसी समाज या निवडणुकीत पक्षापासून दुरावला. त्यामागे अनेक कारणं आहेत. भाजपविरोधात असणारी मराठा, दलित, मुस्लिम मतं विरोधकांकडे एकगठ्ठा गेली. त्याचा फटका भाजपला बसला, असं विश्लेषण संघाच्या पदाधिकाऱ्यानं केलं.