सगळ्यांना उघडं पाडणार! अटकेनंतर ससूनच्या डॉक्टरची धमकी; पोर्शे प्रकरणात बडे मासे अडकणार?

पुणे: पुणे कल्याणीनगरमधील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या तपासातून सरकारी विभागांमधील भ्रष्टाचार उघडकीस येऊ लागला आहे. भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन धनदांडगे काय कायय करु शकतात याची प्रचिती कल्याणीनगर प्रकरणातून आली. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांमध्येच फेरफार केली. धनिकपुत्राला वाचवण्यासाठी इमान विकणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला पोलिसांनी काल अटक केली. यातील अजय तावरे ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत. अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना उघडं पाडणार, अशी धमकी दिली. त्यामुळे तावरे कोणाकोणाला गोत्यात आणणार की तावरेमुळे आपण अडकू नये या भीतीनं तावरेच्या सुटकेसाठी कोण कोण प्रयत्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Pune Car Accident: ‘ती’ कार गिफ्ट दिलेली, आजोबांनी फोटो WhatsApp ग्रुपवर टाकलेला; मित्रानं गुपितं फोडली
तावरे आणि हळनोरला पोलिसांनी काल न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ससूनच्या डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा, पुरावे नष्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणात ससूनच्या आणखी एका कर्मचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अतुल घटकांबळे असं त्याचं नाव आहे.

रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार प्रकरणी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. आरोपींच्या घरांची झडती घ्यायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. पोलीस कोठडीत असलेला डॉ. तावरे याआधीही अनेकदा वादात सापडला आहे. २०२२ मध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं उघडकीस आली. राज्यातही असे प्रकार घडले होते. तेव्हा ससूनचे अधीक्षक डॉ. अजय तावरेची उचलबांगडी करण्यात आली होती.