मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता मदत आणि पुनर्वसन विभाग मोठी भूमिका बजावत असतो. त्याच अनुषंगाने होणाऱ्या बैठकांना मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सातत्याने गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्तीग्रत पीडितांना मदत करण्यास प्रशासन खरेच संवेदनशील आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. याचीच नोंद घेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सचिवांची तक्रार केल्याचे समजते आहे.सोनिया सेठी या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव आहेत. या विभागाच्या होणाऱ्या बैठकांना त्यांची उपस्थिती अनिवार्य मानली जाते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच पूर्वनियोजित बैठकांचे कारण सांगून त्या विभागातील बहुतांश बैठकांना गैजहजर राहत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील घाटकोपर येथील बॅनर दुर्घटनेनंतर झालेल्या अतिशय संवेदनशील बैठकीला देखील त्यांची गैरहजेरी होती. हेच लक्षात घेऊन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सेठी यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन तालुक्यात दौरे, दुष्काळाच्या झळा अनुभवल्या, मुंबईत येताच शरद पवार अॅक्टिव्ह, शिंदेंना तातडीचे पत्र
मदत आणि पुनर्वसन विभागाची निर्णायक भूमिका
राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत आहे. यंदाही अनियमित आणि अत्यल्प पाऊस होईल की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. दुसरीकडे दुष्काळ निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना तसेच राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठ्यात होणारी घट त्यामुळे दुष्काळी भागातील जलस्रोत आटू लागल्याने टँकरच्या मागणीत झालेली वाढ, असे विविध प्रश्न शासन प्रशासनासमोर आहेत. हे प्रश्न सोडविण्यात मदत आणि पुनर्वसन विभाग निर्णायक भूमिका बजावतो. मात्र अशा संवेदनशील विषयांवरील बैठकांना जर विभागाचे सचिवच दांडी मारत असतील तर शासन या प्रश्नांबाबत खरेच संवेदनशील आहे काय? असे प्रश्न विचारले जात आहेत.
सोनिया सेठी यांनी आरोप फेटाळले
मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सेठी यांची तक्रार केल्याची माहिती समोर आलेली असताना सोनिया सेठी यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत. पूर्वनियोजित बैठक असल्याने मी संबंधित बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. परंतु संवेदनशील विषय लक्षात घेऊन मी वेळोवेळी बैठकांना हजर असते, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.