यामिनी जाधव काय म्हणाल्या?
उद्ध ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन सहज सुटलं की कापताना त्रास झाला? असा प्रश्न विचारला असता, यामिनी जाधव म्हणाल्या की, “कुठलाही पाश आपण तोडतो, तेव्हा मनाला त्रास होतोच. यशवंत जाधव यांनी वयाच्या १७ व्या वर्षी शिवसेनेचं काम सुरु केलं होतं. आजही ते शिवसेनेत आहेत. पण एका नेतृत्वाची आपल्याला सवय लागलेली असते. त्या नेतृत्वाला आपण मानतो, त्यांच्या आदेशाखाली काम करतो. त्यांचे अनेक आदेश आपण कुठलाही पुढचा मागचा विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता पाळतो. मग ते पाश तोडताना त्रास तर होतोच. पण त्रास होतो म्हणून चुकीची गोष्ट किती दिवस सहन करायची?” असा सवाल यामिनी जाधव यांनी विचारला.
“शिवबंधन बांधल्यानेच आपण शिवसैनिक होतो असं काही नाही. बाळासाहेबांना कुठल्या शिवबंधनाची गरज पडली नाही. बाळासाहेब स्वतःच एक शिवबंधन होते. ते हिंदूहृदयसम्राट आहेत आणि शिवसेना प्रमुखही आहेत. जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत तेच शिवसेना प्रमुख राहणार आणि मला वेगळं शिवबंधन बांधण्याची गरज नाही” असं यामिनी जाधव यांनी स्पष्ट केलं.
पाहा संपूर्ण मुलाखत
उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याचा कितपत फटका बसेल, याविषयी बोलताना जाधव यांनी आपल्याला सर्व समाजांतून पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ‘माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाली तरीही मी एक विद्यमान आमदार आहे. दक्षिण मुंबईत दलित, मुस्लिम, गुजराती, मारवाडी अशा सर्व समाजांतून मला पाठिंबा आहे. जनता माझ्याकडे एक सक्षम उमेदवार म्हणून पाहत आहे’, असे जाधव यांनी स्पष्ट केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मला मुस्लीम समाजाने भरभरून मतदान केले होते. सर्व समाजाने मला मतदान केले नसते तर २० हजारांहून अधिकचे मताधिक्य मला मिळालेच नसते, असेही त्या म्हणाल्या.