शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून  रोजी मतदान तर निकाल…

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधान परिदेच्या शिक्षक मतदारसंघातील आणि पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी २ मतदारसंघात निवडणुका होणार आहेत.निवडणूक आयोगाने ८ मे रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यानुसार चार जागांसाठी १० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार होता. पण यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केली होती तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली होती.

आता या चारही मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नव्या कार्यक्रमानुसार आयोगाकडून ३१ मे रोजी नोटिशिकेशन जारी केले जाईल आणि याच दिवसापासून अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल करण्याची अखरेची तारीख ७ जून असेल १० जूनला अर्जांची छाननी होतील, अर्ज माघारी घेण्याची तारीख १२ जून असेल तर २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असणार आहे. मतमोजणी १ जुलै रोजी होईल. ही सर्व प्रक्रिया ५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल असे आयोगने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या सदस्यांचा कालावधी संपणार

मुंबई पदवीधर मतदासंघाचे विद्यमान आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखेर, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील हे चारही सदस्य ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.

३१ मे २०२४- अर्ज करण्याची सुरुवात
०७ जून- अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस
१० जून- छाननी
१२ जून – अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस
२६ जून- मतदान (सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत)
१ जुलै- मतमोजणी