रविंद्र वायकर यांनी गुरुवारी ‘मटा कट्टा’च्या कार्यक्रमात बोलताना चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजाआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यासमोर होते आणि माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शुक्रवारी वायकर यांनी त्यांच्या मतदारसंघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी आपल्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
यावेळी रविंद्र वायकर म्हणाले की, ‘ईडीची नोटीस आल्यानंतर मी त्यास सामोरे जातानाच हा सर्व प्रकार खोटा असल्याचे स्पष्ट केले होते. या सर्वांबाबत मी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना भेटून याबाबत मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यांनी वरिष्ठ म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून जे सुरू आहे, ते चुकीचे चालले आहे, हे सांगायला हवे, असे मी त्यांना सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना तुला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे ज्या पक्षाला आपली भूमिका समजत असेल त्या पक्षात प्रवेश करायला हवा, म्हणूनच मी शिवसेना पक्षात प्रवेश केला.’
‘पक्षप्रमुखांनी माझ्यामागे उभे राहायला हवे होते. त्यातून माझी सोडवणूक करायला हवी होती. ती झाली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्याबाबत विचारणाही केली. हे सर्व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे मी त्यांच्यासमोर मांडले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी तणावातून बाहेर आलो, असे वायकर यांनी स्पष्ट केले. पक्षप्रवेश करताना माझ्या विभागातील कामे झाली पाहिजेत, अशी भूमिकाही मी मांडली असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘अपात्रतेचा प्रश्नच नाही’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून रविंद्र वायकर यांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत बोलताना रविंद्र वायकर म्हणाले की, ‘खरी शिवसेना कुणाची आहे, हे न्यायालयाने जाहीर केले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे आहे, हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे अपात्रतेचा प्रश्नच येत नाही.’
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘मोदी पंतप्रधान व्हावेत, ही सर्वांची इच्छा’
‘नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही सर्वांची इच्छा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी माझ्या माध्यमातून मी मदत करणार असल्याचे रविंद्र वायकर यांनी जाहीर केले. धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.