लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात बसलेला धक्का, मराठा-ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे समाजमनांत असलेली अस्वस्थता, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांपुढे असलेले आव्हान, लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विरोधकांना आलेला आत्मविश्वास अशा पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भाजपचे महाअधिवेशन पुण्यातल्या बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्यातील मंत्री आणि पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित होते.
शरद पवार यांनी देशातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप दिले
अमित शाह म्हणाले, खोटा प्रचार करून विरोधकांना निवडणुका जिंकायच्या आहेत. मध्यंतरी शरद पवार यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण खरे तर भारतीय राजकारणातील भ्रष्टाचारांचे सर्वांत मोठे सरदार शरद पवार आहेत. देशातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केले, असा बोचरा वार करत शरद पवार यांच्या १० वर्षांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच जेव्हा जेव्हा राज्यात शरद पवार यांच्या विचारांचे सरकार येते तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाला धक्का लागतो. मराठा आरक्षण टिकविण्यासाठी भाजपचेच सरकार हवे, असे अमित शाह म्हणाले.
उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष
तसेच अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या काँग्रेससोबत स्वत:ला बाळासाहेबांचे वारसदार समजणारे उद्धव ठाकरे बसले आहेत. याकूब मेमनला तुरुंगातून सोडा असे म्हणणाऱ्यांसोबत आपण सत्तेत बसला होतात. पीएफआयला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलात. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांच्या शेजारी आपण बसलात, तुम्हाला लाज वाटायला हवी, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
विधानसभेत महायुतीचा प्रचंड विजय होणार
लोकसभेत भाडपला बहुमत मिळाले नसल्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात सल आहे. पण काळजी करू नका. लोकसभेची कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढा. महाराष्ट्रातले भाजपचे कार्यकर्ते हे प्रचंड कष्टाळू आणि मेहनती आहेत. त्यांच्या श्रमावर मला विश्वास आहे. विधानसभेत महायुतीचा प्रचंड विजय होणार हे मला स्पष्ट दिसतेय, असे अमित शाह म्हणाले.