ज्या शरद पवार यांच्यासमोर अजितदादांनी बंडाचे निशाण नाचवले, त्याच शरद पवार यांनी सहा दशकांचा अनुभव पणाला लावत लोकसभा निवडणुकीत अजितदादांना अस्मान दाखवले. शरद पवार यांचे राजकीय डाव समजत नाहीत, अशी राजकीय क्षेत्रात वदंता आहे. आता तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अशा सगळीकडच्याच जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला; त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये घबराट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या तोंडावर आमदारांनी वेगळा निर्णय घेऊ नये तथापि पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तटकरे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत.
लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.
अहमदनगर उत्तरेतून तटकरेंचे डॅमेस कंट्रोल सुरू होणार, सहा सीट लक्ष्य
दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, नेवासा या अहमदनगर उत्तरेतील विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घेणार आहेत.
दादांच्या आमदारांच्या मनात चलबिचल, ‘पुढे काय?’ चिंतेचे सावट
महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे दोन रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन मागील आठवड्यात पार पडले. नगर येथे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सोहळ्याला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तुफान यशाची झालर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, तर मुंबईत षण्मुखानंद सभागृहात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘पुढे काय?’ या प्रश्नाच्या चिंतेचे सावट स्पष्ट दिसत होते.