मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी सन २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी स्वतंत्र चूल मांडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले. आगामी निवडणुकीत लहामटे हे ‘महायुती’चे उमेदवार राहण्याची दाट शक्यता असल्याने पवार यांनी ‘अकोल्या’त मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांच्यानंतर पिचड यांच्याशी चर्चा झडल्या असून, त्यांना ‘राष्ट्रवादी’त घेण्याची तयारी सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पिचड उपस्थित राहणार?
अकोल्यातील दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त १९ जुलैला अकोल्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शेतकरी मेळावा घेण्यात येणार असून, त्या कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार आहेत. अशोक भांगरे यांचे चिंरजीव अमित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोले विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अमित भांगरे; तसेच त्यांच्या मातुश्री सुनीता भांगरे इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मधुकर पिचड उपस्थित राहणार का, अशी चर्चा अकोले तालुक्यात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
राजकीय समीकरणं बदलणार?
माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांचे कुटुंबीय, मधुकर पिचड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोहिते पाटील आणि पिचड एकेकाळी पवार यांचे कट्टर समर्थक समजले जात होते. असे असताना त्यांनी पवार यांची सोडलेली साथ चर्चेचा विषय होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून, पवारांकडूनही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना साद घालण्यात येत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.