शरद पवार काटेवाडीत काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची येईल, कारखान्याची येईल. प्रत्येक ठिकाणी योग्य निकाल घेण्यासाठी मतदान करायचे आणि लोकांच्या हिताचे राजकारण करायचे, हे सूत्र घेऊन आपल्याला काम करायचे आहे. याच्यासाठी तुम्हा लोकांची एकी हवी आहे. काही लोक दिसत नाहीत मी गेले दोन दिवस बारामती तालुक्यात हिंडतोय. माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे मी गेलो तर अनेक लोक त्या ठिकाणी येतात, सगळे नेते असतात. आता या निवडणुकीत मी जातोय सगळीकडे नव्या पिढीची, गरिबांची, सामान्य लोकांची गर्दी दिसते पण नेते दिसत नाही कुठे. नेते कुठे गेले कळत नाही, असे सांगत मालिका गँग बाजूला झाली असा निशाणा अजित पवार यांचे न घेता शरद पवार यांनी साधला.
मलिदा गँगला धडा शिकवायचा
आपल्याला दुरुस्ती करायची आहे, लोकांच्या जीवनात फरक करायचा आहे आणि त्यासाठी स्वच्छ व्यवहार याच्याशी तडजोड करायची नाही. जिथे मलिदा गॅंगचे काही उद्योग असतील तिथे त्यांची जागा दाखवून देऊ आणि परिसर हा दुरुस्त करू, एवढंच काम करायचंय, त्यासाठी तुम्ही जागरूक रहा.
कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार
आता काही गोष्टींकडे मला लक्ष द्यावे लागेल. आपल्याकडे कारखानदारी आहे. छत्रपती कारखाना सुरू करण्यामध्ये त्या काळात काटेवाडीच्या अनेकांचा हातभार होता. माझे वडील त्यामध्ये होते, आप्पासाहेब पवार यांचे योगदान होते आणि ही कारखानदारी चांगली चालली होती. आता काय झाले मला माहिती नाही, आता कोण मार्गदर्शन करतं याच्या खोलात जावं लागेल, असा टोलाही लगावत इथल्या कारखान्याची निवडणूक किती हे तुमच्या संसाराची निवडणूक आहे. तुमच्या संसाराची निवडणूक असेल त्याच्यामध्ये लक्ष घालावेच लागेल, असे ते म्हणाले.
स्वच्छ, चारित्र्यसंपन्न राजकारणाची सुरूवात करायची
कुठलीही निवडणूक आली त्यासाठी जागरूक रहा. तुमच्या जागरुकीच्या जोरावर आपण चित्र बदलू आणि ते चित्र बदलायचे आहे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात बदल करायचा आहे, महाराष्ट्रात राज्य आणायचाय. आणि महाराष्ट्रात राज्य आणून जे काही लोकांचे सुख दुःख आहे त्यातून लोकांची सुटका करायची, असा निश्चय पवार यांनी बोलून दाखवली.
स्वच्छ, चारित्र्यसंपन्न राजकारणाची समाजकारणाची सुरुवात करायची आहे. एवढेच मी या ठिकाणी सांगतो, असे पवार म्हणत असताना युगेंद्र यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. नेते कुठेही गेले तरी सामान्य लोक कुठे गेले नाही हे सुप्रियाच्या निवडणुकीत मी बघितलं. पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनी सुद्धा आपलं काम चोख केलं त्यामुळे या ठिकाणी यश आलं त्याच रस्त्याने जाण्याचा निर्धार आपण करूया, पाऊलं टाकूया मी तुमच्या बरोबर आहे, असे ठामपणे सांगून शरद पवार यांनी विधानसभेच्या अनुषंगाने फासे टाकायला सुरूवात केली आहे.
काकांचे आव्हान पुतण्या कसे पेलणार?
शरद पवार यांनी जर युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली तर शरद पवार लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूक हाती घेऊन अजित पवार यांची विधानसभेत जायची वाट बिकट करणार, यात शंका नाही. त्यामुळे शरद पवार यांचे आव्हान अजित पवार कसे पेलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.