मावळ प्रांत बारा खोऱ्यांमध्ये विखुरला आहे. यामध्ये आंदर मावळ, कोरबारसे मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कानद खोरे, पौड खोरे, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक शहरे; तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा क्षेत्र या मतदारसंघात येतात. त्यामुळे घाटावरील आणि घाटाखालील भाग अशी भौगोलिक ओळख ढोबळमानाने केली जाते. दोन्ही भागांतील प्रश्न, स्थानिक समस्या वेगवेगळ्या आहेत. शेतकरी, कामगार, मच्छिमार, आदिवासी, चाकरमनी, पर्यटक या प्रमुख घटकांच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब प्रचारकाळात उमटते. केंद्र सरकारशी संबंधित रेल्वे, रेडझोन, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, पर्यटन या क्षेत्रातील प्रश्नांचा ऊहापोह होतो. ते सर्वार्थाने सुटलेले नाहीत. याउलट लोकसंख्येच्या तुलनेत समस्यांमध्ये वाढ होत आहे.
मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यापैकी जवळपास निम्मी (सुमारे १२ लाख) मतदारसंख्या चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात आहे. उर्वरित निम्मे मतदार चार विधानसभा क्षेत्रांत आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघांतील मतदारांच्या भूमिकेला महत्त्व आहे. मागील तिन्ही निवडणुकांतील लढती घाटावरील दोन प्रमुख उमेदवारांमध्ये झाल्या आहेत. २००९मध्ये गजानन बाबर विरुद्ध आझम पानसरे, २०१४मध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध लक्ष्मण जगताप आणि २०१९मध्ये बारणे विरुद्ध पार्थ पवार असे लढतींचे स्वरूप होते. यंदा सलग चौथ्यांदा घाटावरील उमेदवार बारणे विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील आमनेसामने आहेत. त्यामुळे विजयाची माळ घाटावरील उमेदवाराच्याच गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट आहे.
कागदावर महायुतीची ताकद
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद आहे. ठरावीक ठिकाणी शिवसेना प्रभावी आहे; तर मर्यादित ठिकाणी शेकापचे प्राबल्य आहे. आतापर्यंत भाजप-सेना युतीच्या जागावाटपात मावळची जागा सेनेला मिळाली आहे. युती धर्माचे पालन झाले आहे. त्यामुळे सेनेला यश मिळाले, ही वस्तुस्थिती आहे. या वेळी शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आहे. त्यामुळे ताकद दुपटीने वाढली आहे. मात्र, त्याचे रूपांतर मतांमध्ये होईल की नाही, याची खात्री नाही. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या दारुण पराभवाची सल राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच आहे; तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या कलंकापासून बचाव करण्याचे आव्हान आहे. या कात्रीमध्ये घटक पक्षाला मनापासून प्रचार यंत्रणेत सहभागी घेण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सरकारविरोधी लहरीचा दावा
महाआघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘उबाठा’मध्ये प्रवेश केला. इतकेच नव्हे; तर या पक्षाची उमेदवारी मिळविली. देशात सरकारविरोधी लहर असल्याचा दावा ‘इंडिया’ आघाडीकडून केला जात आहे. या संधीचा फायदा होईल, अशी अपेक्षा वाघेरे-समर्थकांना आहे. सत्ताधारी पक्षांतील नाराजी, वाढती महागाई, बेरोजगारी आणि प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला जात आहे. शिवाय माजी आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून घाटाखालील शेकापची ताकद आघाडीला मिळाल्याचे सांगत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आघाडीच्या बाजूने असल्याची कुजबूज आहे.