‘ई-तक्रारी’नंतर कमाल तीन दिवसांत गुन्हा
अनेकांना पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची भीती वाटते, त्यामुळे ते पत्राद्वारे किंवा ‘ई-मेल’द्वारे पोलिसांना खबर देतात. या माध्यमातून तक्रार प्राप्त झाली असेल, तर संबंधित व्यक्तीला कमाल तीन दिवसांत पोलिस ठाण्यात बोलावून प्रकरणाची चौकशी करावी आणि तक्रार दाखल करून घ्यावी. त्यानंतर तक्रारदाराला किंवा पीडित व्यक्तीला प्रथम खबरी अहवालाची प्रत देण्यात यावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
‘गुन्हा दाखल करताना हद्दीच वाद नको’
गुन्हा दाखल करून घेताना, तक्रारदाराचा जबाब नोंद करताना हद्द आणि घटनास्थळ याला प्राधान्य देऊ नये. अन्य कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना असली तरीही तक्रार येताच तात्काळ दाखल करून घ्यावी लागणार आहे. वास्तविक, अशा प्रकारचे आदेश पोलिसांना यापूर्वीही देण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.
‘यथार्थ डिव्हाइस’ काय?
यथार्थ हा आरोपींचे व्हिडिओ आणि छायाचित्रे आणि गुन्हा घडलेल्या ठिकाणाचा डिजिटल पुरावा रेकॉर्डर आहे. हे उपकरण बोटांचे ठसे रेकॉर्ड करण्यास देखील मदत करते. त्यात रेकॉर्ड केलेल्या गोष्टींसोबत छेडछाड करता येत नाही. त्यामुळे ते पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य आहे. हे डिव्हाइस यापूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहे. मात्र, त्याच्या वापराचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच, त्याचा वापर कसा करावा, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. आता ‘यथार्थ’चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू म्हणजे काय?
हॅश व्हॅल्यू ही एक संख्या आहे. त्याद्वारे संबंधित व्हिडिओचा अनुक्रम दर्शविली जातो. ती संख्या ड्राइव्ह किंवा फाइलच्या डिजिटल सामग्रीवर आधारित अल्गोरिदमद्वारे तयार केली जाते. मूळ व्हिडिओ आणि कॉपी किंवा छेडछाड केलेला व्हिडिओ याची हॅश व्हॅल्यू एकसारखी नसते.