काय घडलं?
मूळचे सिंधुदुर्ग येथील अमित पवार हे कांदिवलीतील चारकोप परिसरात वास्तव्यास होते. कोकणातील गावी जाण्यासाठी गुरुवारी त्यांनी कोकणकन्या एक्स्प्रेसचा पर्याय निवडला. आरक्षण पूर्ण झाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याने, त्यांना डब्यात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे जनरल डब्याच्या दरवाजावरील पायदानावर लटकत प्रवास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र दादर स्थानकातील फलाट क्रमांक११वरून गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला, ते फलाटाच्या टोकावर पडले आणि गाडीच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
अपघाती मृत्यूची नोंद
गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या एक्स्प्रेसमधील जनरल डब्यातून प्रवास करत असताना तोल गेल्याने प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी केले आहे.
धोकादायक प्रवास टाळा; पोलिसांचे आवाहन
सध्या उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणकन्येसह कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी आहे. रेल्वे प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसच्या दरवाजात लटकून किंवा पायरीवर उभे राहून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.