राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा; अजितदादांनी शब्द पाळला, दोन नावं जाहीर

मुंबई: भाजप, शिंदेसेनेपाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं कालच पाच नावांची घोषणा केली असून शिंदेसेनेनं दोघांना तिकीट दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या खासदारांची वर्णी शिंदेसेनेकडून परिषदेवर लावण्यात येणार आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे ५, शिंदेसेना आणि अजित दादांचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी होऊ शकतात. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांच्या नावांची घोषणा केली आहे. गर्जे मुंबईचे, तर विटेकर परभणीचे आहेत.
Pankaja Munde: भाजपकडून पुनर्वसन, पंकजा मुंडे परिषदेवर; अर्ज भरण्याआधी म्हणाल्या, आमचे नेते देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी झाली. त्यात इच्छुकांच्या नावांवर चर्चा, मंथन झालं. यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. त्यात बाबा सिद्दिकी, आनंद परांजपे, संजय सावंत, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता. या बैठकीत गर्जे आणि विटेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या नावांची घोषणा पक्षाकडून आज करण्यात आली.
Pankaja Munde: लोकसभेतील पराभवानंतर लगेच परिषदेवर संधी; पंकजा मुंडेंच्या आमदारकीनं भाजपनं साधल्या ३ गोष्टी
शिवाजीराव गर्जेंच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी अखंड असताना राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी करण्यात आली होती. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदी होते. त्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवर निर्णय घेतला नाही. परिणामी नियुक्त्या रखडल्या आणि गर्जेंना संधी मिळाली नाही. गर्जे हे पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाच्या कायदेशीर बाबी सांभाळण्याचं काम ते करतात.

राजेश विटेकरांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. २०२४ मध्येही ते लोकसभा लढण्यास उत्सुक होते. परभणीची जागा राष्ट्रवादीला मिळाली असल्यानं त्यांच्या आशा उंचावल्या. पण भाजपच्या आग्रहावरुन राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणीची जागा रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांना देण्यात आली. जानकरांचा सव्वा लाख मतांनी पराभव झाला. लोकसभेची संधी हुकलेल्या विटेकरांना आता अजित पवारांनी परिषदेवर संधी दिली आहे. अजित पवारांनी या आमदारकीच्या माध्यमातून विटेकरांना दिलेला शब्द पाळला आहे.