रामकृष्ण हरी! तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, इंद्रायणीकाठी वारकऱ्यांची मांदियाळी, कार्यक्रमाची रुपरेषा

प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, शुक्रवारी (२८ जून) देहूतून प्रस्थान होणार आहे. या निमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

सोयीसुविधांची तयारी पूर्ण

श्री. क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Chandrapur: देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित; लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवायांचा ठपका

आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही

इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. मंदिरात आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

भोजनाची सोय

संस्थानने पालखी प्रस्थान सोहळ्याची रूपरेषा जाहीर केली आहे. मुख्य मंदिरात सकाळपासूनच दिंड्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मानाचे अश्व सज्ज असून, पालखी आणि रथाची सजावट करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी संत तुकाराम अन्नदान मंडळाने भोजनाची सोय केली आहे. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला आहे.

‘निर्मल वारी’चा संकल्प

संस्थान आणि नगरपंचायत यांच्या वतीने यंदाही ‘निर्मल वारी’चा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी स्वच्छतेच्या अनुषंगाने पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास ५०हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंद्रायणी नदीघाट, देऊळवाडा या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. गावात ठिकठिकाणी एक हजारांहून अधिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले असून, भाविकांसाठी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
RMC प्रकल्पांमुळे श्वास घेणे अवघड; मालवाहतूक बेततेय जीवावर, वर्षभरात ४५ जणांचा चिरडून मृत्यू

प्रस्थान कार्यक्रम रूपरेषा

पहाटे ४.३० महापूजा

सकाळी ५ ते ७ काकडा

८ ते ९ गाथा भजन

१० ते दुपारी १२ काल्याचे कीर्तन

दुपारी १२ ते १ जरीपटका सन्मान

१ ते २ पादुका पूजन व सत्कार

दुपारी २ पालखी प्रस्थान

सायंकाळी ६ पालखी मुक्काम

रात्री ९ ते ११ कीर्तन, जागर

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी

– शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक.

– सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर.

– मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा.

– दिंडीप्रमुखांचा सत्कार.

– पालखी मार्गावर वृक्षारोपण.

– फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे.

– वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध.