बीडच्या जागेवर मविआचे बजरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्यापेक्षा पुढे असले तरी पंकजा मुंडे यांच्याकडून आक्षेप नोंदवल्याने फेरमोजणी होणार किंवा कसे हे स्पष्ट झाले नव्हते.
विदर्भातील १०पैकी केवळ नागपूर व अकोले या दोनच जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. उत्तर महाराष्ट्रातही रावेर व जळगाव वगळता भाजपला खाते उघडता आलेले नाही. मुंबईत पक्षाला तीनपैकी केवळ एकच जागा मिळाली आहे. पालघर, पुणे, सातारा येथे मात्र पक्षाला यश मिळाले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पाडण्यात आली, अशी धारणा जनतेमध्ये झाल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही भाजपला भोवले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदीमुळे भाजपने केंद्रीय मंत्री भारती पवार यांची दिंडोरीची जागा हातची घालवली. नगरमध्ये सुजय विखे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांच्या इंग्रजीची वारंवार मस्करी केल्याने जनतेने दणका दिल्याचे जाणकार म्हणत आहेत. मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्यात आले होते. हा आरोप पुसण्यात भाजपला यश आले नाही. मराठवाड्यात जालनासारख्या बालेकिल्ल्यात रावसाहेब दानवे यांना त्यामुळेच पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांचीही पुरती दमछाक झालेली आहे.
मुंबईत पूनम महाजन यांचे तिकीट कापणार, हे स्पष्ट झाल्यावर आशिष शेलार यांचे नाव उत्तर मध्य मुंबईमधून सुरुवातीला चर्चेत होते. मात्र अचानक तिथे उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली गेली. याबाबत कार्यकर्ते पूर्णतः अनभिज्ञ होते. निकम यांच्यासारख्या राजकारणाचा अनुभव नसलेल्या उमेदवारालाच आणायचे होते तर पूनम यांचे नाव कापण्यामागे नक्की काय कारण होते, हे भाजपमधील एकही नेता सांगू शकलेला नाही. ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांचे तिकीट कापून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्याची भाजपची रणनीतीही पुरती फसली. त्यातच तळागाळापर्यंत पोहोचलेला संविधान बदलाचा मुद्दा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला खोडून काढता आला नाही.
या निकालामुळे भाजपचे महायुतीतील वजन खचितच घटले असून १५ जागा घेत सात जागी विजय मिळवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी २८ जागा घेऊन नऊ जागा मिळवणाऱ्या भाजपपेक्षा कितीतरी पटींनी चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेवर काय परिणाम?
राज्यात ज्या पद्धतीने काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे ते पाहता याचा फायदा आघाडीला विधानसभेतही निश्चित होईल. मात्र त्यासाठी या तिन्ही घटक पक्षांना आपांपसातील एकी कायम ठेवावी लागेल. विधानसभेत फार थोड्या फरकांनी एखाद्या उमेदवाराचा विजय वा पराभव होतो; त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित राहिल्यास आणि त्यांनी योग्य जागावाटप केल्यास त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे.