मे महिन्यात बहुतांश भागात वैशाख वणव्याची जाणीव, उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीहून अधिक राहणार

प्रतिनिधी, मुंबई : एप्रिलमध्ये उष्ण आणि दमट हवामानाने काहिली झालेली असताना मे महिन्यातही देशाच्या बहुतांश भागात सरासरीहून अधिक कमाल तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असू शकतील. १ मे रोजी भारतीय हवामान विभागाने मे महिन्यासाठीचे हवामान आणि पावसाचे पूर्वानुमान जारी केले. या अंदाजानुसार, मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागात वैशाख वणव्याची जाणीव वाढण्याची शक्यता आहे.मे महिन्यासाठीच्या पूर्वानुमानानुसार देशाचा ईशान्य भाग, वायव्येकडील तसेच मध्य भारतातील काही भाग वगळता इतर भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक असू शकेल. केवळ कमालच नाही, तर किमान तापमानही देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीहून अधिक असू शकेल. वायव्य भारताचा काही भाग, गंगेच्या खोऱ्याचा काही भाग, मध्य भारताचा काही भाग तसेच ईशान्य भारताचा बहुतांश भाग येथे किमान तापमान सरासरी ते सरासरीहून कमी असू शकेल. या उष्णतेच्या लाटांच्या काळात वाढलेल्या तापमानाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, व्याधीग्रस्त नागरिक यांना त्रास होऊ शकतो.

गडचिरोलीला मोहफुलाचे ‘अर्थ’बळ! विविध खाद्य पदार्थ तयार करण्याचे पाच हजार महिलांना प्रशिक्षण

या महिन्यामध्ये कमाल तापमानाचा पारा चढा असला तरी या काळात देशभरात सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे. सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी जारी केलेल्या पूर्वानुमानात वर्तवला आहे. या काळामध्ये देशात ६१.४ मिलीमीटर पावसाची नोंद होते.

कोकणासाठी कसा असेल मे महिना?

कोकण विभागात मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटांचे प्रमाण मात्र सरासरीइतके असू शकेल.

विविध भागांतील उष्णतेच्या लाटांचे दिवस

– दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरात

यंदा ८ ते ११ दिवस (एरव्ही सरासरी ३ दिवस)

– राजस्थानचा उर्वरित भाग, पूर्व मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगढचा काही भाग, ओडिशाचा अंतर्भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचा प्रदेश, झारखंड, बिहार, अंतर्गत कर्नाटक, तेलंगण

५ ते ७ दिवस

एप्रिल ते मे या कालावधीतील उष्णतेच्या लाटेचे दिवस

एरव्हीची सरासरी : ४ ते ८ दिवस

यंदाचा अंदाज : १० ते २० दिवस