मुंबईमध्ये घटले मातामृत्यू, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश, अशी आहे आकडेवारी…

मुंबई : गर्भवती महिला व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना आता यश येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये मुंबईमध्ये मातामृत्यूंचे प्रमाण २२ टक्क्यांनी घटल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येत आहे.

सन २०१९मध्ये जन्माला येणाऱ्या एक लाख बालकांमागे ८७ मातामृत्यूंची नोंद झाली होती. करोनाकाळामध्ये ही संख्या वाढून २०२०मध्ये ९१वर गेली. २०२१मध्ये त्यात अल्प घट होऊन ती ८२ झाली. २०२२ मध्ये हा आकडा घटून ७०वर गेला. २०२३पर्यंत हे प्रमाण अजून घटले असून एक लाख नवजात बालकांमागे ६८ मातामृत्यूंची नोंद झाली.

लोकसंख्येमध्ये माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असणे हे आरोग्याचे महत्त्वाचे निर्देशक मानले जाते. दर वर्षी जन्माला येणाऱ्या एक लाख बालकांमध्ये किती मातांचे मृत्यू होतात, याचा अभ्यास केला जातो. त्यावरून त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, आई व बाळांच्या आरोग्यासंदर्भात घेण्यात येणारी वैद्यकीय काळजी या बाबींचे महत्त्व अधोरेखित होते.

मुंबईत माता-बाल आरोग्यात सुधारणा करण्यासाठी प्रसूतिपूर्व काळजी, लवकर नोंदणी, गर्भवतींची चाचणी, नियमित वैद्यकीय पाठपुरावा, प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न अशा उपाययोजना करण्यात आल्या. २०२२मध्ये दोन नवीन प्रसूतिगृहे सुरू करण्यात आली. भांडुप येथील प्रसूतिगृहामध्ये २० खाटांचे एनआयसीयू सुरू करण्यात आले असून यावर्षी त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. प्रसूतिगृहांना जवळच्या उपनगरीय रुग्णालयांच्या संदर्भसेवा देण्यात आल्या आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिजोखमीच्या रुग्णांना नेण्यात येत आहे, तर दर दोन महिन्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आशा, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच विशेषज्ज्ञांची समिती नेमून त्या माध्यमातून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांचे विश्लेषण करण्यात येते.

गोवंडीवासींपुढे समस्या

आजही शहराच्या काही भागामध्ये उदा. गोवंडीसारख्या झोपडपट्टी भागामध्ये सर्वाधिक मातामृत्यू होतात. इथे अजूनही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याची खंत आरोग्य कार्यकर्ते आर. पी. मोरे व्यक्त करतात. डॉक्टरांचा तुटवडा असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांना महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते. गर्भवतींना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो, त्यामुळे उपचारांनाही विलंब होतो. नवजात अतिदक्षता विभागामध्ये (एनआयसीयू) खाटांची संख्या अनेकदा मर्यादित असते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका रुग्णालयातून दुसरीकडे धाव घ्यावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बालकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी

लहान मुलांमधील मृत्यूचे प्रमाण अजून कमी होण्याची गरज आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे. मुदतपूर्व प्रसूती, न्यूमोनिया, कावीळ, संसर्ग यांमुळे मुलांमधील मृत्यूंची संख्या वाढताना दिसते. विविध संसर्ग आणि श्वसनविकार यांमुळेही मुलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी अधिक भेडसावतात, असे दिसून आले आहे.

मातामृत्यूंचा आकडा
२०१९
एक लाखामध्ये ८७

२०२३
एक लाखामध्ये ६८