मुंबईत उकाड्यात वाढ, पाऊस कधी?
मुंबईत या आठवड्यात जोरदारल पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाचा हा अंदाज फोल ठरला असून सोमवार आणि मंगळवारी मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या. पावसाने अचानक ब्रेक घेतल्याने उकाडा पुन्हा एकदा वाढला आहे. तर, कमाल तापमानातही वाढ झाली आहे. तरी, मुंबईत पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, पुण्याला यलो अलर्ट
तर, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, वर्धा अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर २८ जूनला रत्नागिरी आणि रायगटला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, आज धुळे, नंदुरबार आणि नाशकात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा आहे.