मुंबई शहरात कोकणी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. यासोबतच मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील असलेले लाखो लोक मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यामुळे शिंदेंनी त्यांच्या तीन मंत्र्यांना सक्रिय केलं आहे. तातडीनं कामाला लागा, असे आदेश शिंदेंनी दिले आहेत. मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई यांच्याकडे मिशन मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. चौकसभा, मॅन टू मार्किंग करण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनमानसात सहानुभूती असल्याचं बोललं जातं. त्यातच मुंबई आणि ठाकरे कुटुंब यांचं वेगळं नातं आहे. शिवसेनेत आजही ठाकरेंची ताकद आहे. पक्ष संघटनेचं जाळं त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच शिंदेंनी मुंबईची मोहीम फत्ते करण्यासाठी तीन विश्वासू शिलेदारांची निवड केली आहे.
उदय सामंत रत्नागिरीतून निवडून येतात. ते तिथून सलग चारवेळा विजयी झाले आहेत. तर दीपक केसरकर सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतून तीनवेळा निवडून आले आहेत. शंभुराज देसाई साताऱ्याच्या पाटणमधून तीनदा आमदार झाले आहेत. मुंबईत राहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणी लोकसंख्येचं प्रमाण पाहता तीन मंत्र्यांकडे मुंबईची जबाबदारी असेल. याशिवाय ठाण्यातील काही विश्वासू नगरसेवकांकडेही मुंबईवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण अशा ३ मतदारसंघात शिंदेसेनेनं उमेदवार दिले आहेत. दक्षिण मध्यमधून विद्यमान खासदार राहुल शेवाळे, उत्तर पश्चिममधून रविंद्र वायकर, दक्षिणमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील तीनपैकी तीन जागा जिंकल्या होत्या. पैकी दोन खासदारांनी बंडानंतर शिंदेंना साथ दिली. मुंबईतील तिन्ही जागांवर शिंदेंसेनेचा मुकाबला ठाकरेसेनेशी होईल.