मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, धरणात इतकेच पाणी शिल्लक

मुंबई : महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक उपयोगात यावा, यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार, ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. याआधीच ३० मेपासून पाच टक्के पाणीकपात लागू केली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा सात टक्के पाणीसाठा असून राखीव पाण्याचाही वापर करण्यास सुरुवात झाली आहे.सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांत १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रिय होता. त्या तुलनेत २०२३मध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या सात धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या धरणांची साठवणूक क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यामध्येही, सर्वांत मोठे धरण असलेल्या अप्पर वैतरणातील पाणीसाठा शून्याखाली गेला असून, यातील ९१ हजार १३० दशलक्ष लिटरचा राखीव पाणीसाठा वापरण्यास सुरुवात केली आहे. या राखीव कोट्यापैकी आतापर्यंत ११ हजार ५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठाही वापरला आहे. भातसा धरणात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक आहे. या धरणात एक लाख ३६ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा राखीव असून त्याचा वापर अद्याप सुरू केलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत एकूण सात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याची पाण्याची स्थिती पाहता ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

उर्वरित पाच धरणांतील पाणीसाठा
मोडक सागर १५ टक्के
तानसा २५ टक्के
मध्य वैतरणा १० टक्के
विहार १९ टक्के
तुळशी २७ टक्के
Nashik News: अक्षय ऊर्जा वापरणाऱ्यांना मनपाकडून ‘गिफ्ट’; साडेनऊ हजार नागरिकांचे १६ लाख वाचले, कसे ते वाचा
यंदा कपात लवकर

या वर्षी ३ जून रोजी धरणांमध्ये सात टक्के पाणीसाठा आहे. २०२३ मध्ये याच तारखेला १२ टक्के आणि २०२२ ला १६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहा टक्के पाणीकपात केली होती. यंदा पाणीसाठा अधिकच खालावल्याने मे अखेरपासूनच पाणीकपात लागू केली आहे.