पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव येथे गुरुवारी मान्सून दाखल होऊ शकतो, असे बुधवारी हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी अनुपम काश्यपी यांनी सांगितले. मुंबईसह जालना, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी येथे ७ किंवा ८ जूनला मान्सून दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. सोमवार १० जूनपर्यंतच्या पाच दिवसांदरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्याचा काही भाग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशीव, लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यात आणि लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी नमूद केले.
मुंबईत बुधवारी काही भागांत पावसाचा शिडकावा झाला, तर एखाद् दुसऱ्या भागात पावसाने काही वेळ जोरदार उपस्थिती लावली. कुलाबा येथे दिवसभरात दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. स्वयंचलित केंद्रावर चेंबूर येथे दिवसभरात १९ मिलीमीटर, तर सायन येथे २५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. उर्वरित मुंबईमध्ये मात्र अंशतः ढगाळ वातावरणानंतर पावसाची उपस्थिती अजिबात नव्हती. दुपारी काही वेळ वाऱ्यामुळे उकाडा काहीसा कमी झाल्यासारखाही जाणवल्याचे मुंबईकरांनी सांगितले.
कुलाबा येथे ३४.,९ तर सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतील शिडकाव्यानंतर कुलाबा येथे मंगळवारपेक्षा ०.७ अंशांनी तापमान उतरले. गुरुवारपासून मुंबईत मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवार ते शनिवार या काळात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
– राज्यात मान्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती
– तीन दिवसांत दक्षिण भागात हजेरीची शक्यता
– मुंबईत ७ ते ८ जूनदरम्यान मिळणार दिलासा
उकाड्यापासून सुटकेची आशा
मुंबईमध्ये सोमवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे काही मॉडेलनुसार दिसत असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. यंदाचा उन्हाळा मान्सूनपूर्व सरींअभावी अधिक तीव्र भासल्याने पावसाचा शिडकावाही मुंबईकरांना दिलासा देणारा ठरला आहे. गुरुवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने आता तरी चढे तापमान आणि उकाड्यापासून सुटका होईल अशी आशा मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे.