मिठागरे, मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन आणि पीएपी प्रकल्प, डंपिंग ग्राऊंड, मोडकळीस आलेल्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, मराठी आणि गुजराती वाद आदी मुद्यांवर कोटेचा यांनी परखड मते मांडली. धारावीतील एक लाख अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारकडून ताब्यात घेण्याबाबत मध्यंतरी बऱ्याच हालचाली झाल्या. पर्यावरणाच्या दृष्टीने हा भाग तसा महत्वाचा ठरतो. त्यामुळे पर्यावरणाला हानी होईल, असे प्रकल्प मिठागरांवर नकोच, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’मध्ये त्यांनी घाटकोपरमध्ये घडलेल्या मराठी विरुध्द गुजराती मुद्द्यावर भाष्य केले. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने भाषा, धर्माचे ‘टूलकिट’ वापरत असल्याचे कोटेचा म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या घटना माझ्या मतदारसंघात होत आहेत, त्या नियोजनबद्ध होत असून त्यातून अपप्रचारच करण्यात येत आहे. घाटकोपरमधील घटनांमध्ये, कार्यकर्त्यांना सोसायटीतील रहिवाशांनी याआधीच पक्षाला वेळ दिल्याचे सांगितले होते. मात्र काहीही ऐकून न घेता त्यांनी ठरवून हा मुद्दा केला. माझे विरोधी उमेदवार संजय दिना पाटील हे पाच वर्षे खासदार होते. त्यांनी त्या पाच वर्षांत काय कामे केली हे सांगावे’, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्याकडून भाषा, धर्माचा वापर केला जात असल्याचा पुनरुच्चार केला. गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच निवडून आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
‘देवनार आणि विक्रोळी-कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरून विरोधक आमच्याकडे बोट दाखवतात. मात्र यापूर्वीचा इतिहास तपासल्यास शिवसेनेचे दत्ता दळवी महापौर असताना त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या निर्णयामुळे विक्रोळी, भांडुप, मानखुर्द भागाला डम्पिंगची भेट मिळाली’, असे ते म्हणाले. ‘देवनार, कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२५ पर्यंत आहे. या कराराचे नूतनीकरण यापुढे होऊ देणार नाही. प्रसंगी त्यासाठी न्यायालयातही जाईन’, असा इशारा त्यांनी दिला. डम्पिंग ग्राऊंडसाठी मुंबई महापालिकेने तळोजा येथे यापूर्वीच भूखंड घेतलेला आहे, असे ते म्हणाले.
० ही मुंबई, मराठी अस्मितेची लढाई : वर्षा गायकवाड
० तोडा-फोडाची नीती चालणार नाही : भूषण पाटील