मावळमधून श्रीरंग बारणे विजयी, ठाकरेंचे शिलेदार संजोग वाघेरे पराभूत

मावळ : सलग तीन वेळा शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मावळ मतदारसंघाचा गड राखण्यासाठी यंदा सेनेतच लढाई जुंपली. या लढाईत शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली असून ठाकरेंचे शिलेदार संजोग वाघिरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुरूवातीला वाघेरे यांनी आघाडी घेतली होती. परंतु नंतर ती आघाडी तोडून बारणे यांनी मताधिक्याची मालिका सुरूच ठेवली. अखेर दुपारी साडेचारच्या सुमारास बारणे यांना विजयी घोषित करण्यात आले.

सद्यस्थितीत प्राबल्य असूनही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सहकारी भूमिकेत राहावे लागले. बदलत्या राजकीय समीकरणात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे महायुतीच्या माध्यमातून विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक होते. त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी जोरदार आव्हान निर्माण केले. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमधील निम्मा-निम्मा भाग मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्त्वात आला. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर प्रथमच ठाकरे-शिंदे गटामध्ये लढाई जुंपली होती. या लढाईत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. उमेदवारी जाहीर होईपर्यंत या जागेसाठी भाजपने आग्रह धरला होता; परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजपची सर्व यंत्रणा प्रचारात सहभागी झाली.

उमेदवार पक्ष जय/पराजय
श्रीरंग बारणे शिवसेना
संजोग वाघेरे पाटील

मावळ प्रांत बारा खोऱ्यांमध्ये विखुरला आहे. यामध्ये आंदर मावळ, कोरबारसे मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कानद खोरे, पौड खोरे, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक शहरे; तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा क्षेत्र या मतदारसंघात येतात. त्यामुळे घाटावरील आणि घाटाखालील भाग अशी भौगोलिक ओळख ढोबळमानाने केली जाते. दोन्ही भागांतील प्रश्न, स्थानिक समस्या वेगवेगळ्या आहेत. शेतकरी, कामगार, मच्छिमार, आदिवासी, चाकरमनी, पर्यटक या प्रमुख घटकांच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब प्रचारकाळात उमटते. केंद्र सरकारशी संबंधित रेल्वे, रेडझोन, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, पर्यटन या क्षेत्रातील प्रश्नांचा ऊहापोह होतो. ते सर्वार्थाने सुटलेले नाहीत. याउलट लोकसंख्येच्या तुलनेत समस्यांमध्ये वाढ होत आहे.

मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यापैकी जवळपास निम्मी (सुमारे १२ लाख) मतदारसंख्या चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात आहे. उर्वरित निम्मे मतदार चार विधानसभा क्षेत्रांत आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघांतील मतदारांच्या भूमिकेला महत्त्व होते.

सरकारविरोधी लहरीचा दावा होता पण…

महाआघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘उबाठा’मध्ये प्रवेश केला. इतकेच नव्हे; तर या पक्षाची उमेदवारी मिळविली. देशात सरकारविरोधी लहर असल्याचा दावा ‘इंडिया’ आघाडीकडून सातत्याने केला जात होता. या संधीचा फायदा होईल, अशी अपेक्षा वाघेरे-समर्थकांना होती. सत्ताधारी पक्षांतील नाराजी, वाढती महागाई, बेरोजगारी आणि प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला गेला. शिवाय माजी आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून घाटाखालील शेकापची ताकद आघाडीला मिळेल असे सांगितले गेते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आघाडीच्या बाजूने असल्याची कुजबूज होती. परंतु सरकारविरोधी लहरीचा फायदा वाघेरेंना घेण्यात अपयश मिळाले.