यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे. देवेद्र फडणवीस म्हणाले की, या सभागृहात स्क्रिनवरील आणि राजकारणातील असे दोन्ही क्षेत्रातील कलाकार आहेत. तसेच उपस्थित अनेक कलाकारांचे मी स्वागत करतो. आजच्या दिवशी म्हणजेच गुरूपोर्णिमेच्या पुर्वसंधेला ज्यांनी एकनाथ शिंदे सारखे नेता घडवला आणि अनेक चांगले अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारीत असलेल्या धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या ट्रेलरचे अनावरण झाले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावरही टीकास्त्र सोडल्याचे पहायला मिळाले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही फक्त चित्रपटाची टॅगलाईन नसून आमची देखील हीच टॅगलाईन आहे, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. तसेच चित्रपटातील कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला त्या लोकांना या चित्रपटाने प्रेरणा दिली आहे, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी अनेकांना माहिती नव्हतं याचा भाग २ देखील येईल. तसेच एकनाथ शिंदेंच्या जीवनाचाही भाग २ सुरू होईल. मात्र लवकरच हा भाग २ देखील सुरू झाला. आनंद दिघेंच्या शिकवणीप्रमाणे जसा एकनाथ शिंदेंनी कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे आता आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदेंना स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. कारण या दोघांनाही विचारांशी गद्दारी मान्य नव्हती. तसेच एकनाथ शिंदेंना विचारांशी गद्दारी मान्य नव्हती. यामुळे ते सत्तेतून बाहेर आहे. मात्र दुर्दैवाने एकनाथ शिंदेंनाच गद्दार म्हणून हिणवलं गेलं. मात्र आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या लोकांची ताकद मागे असते तेव्हा कोणी किती हिणवलं तरी खरं सोनं काय आहे हे जनतेला कळतं. त्यामुळे हे सोनं जनतेला कळल्याने राज्याने एकनाथ शिंदेंना स्वीकारलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.