एकीकडे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळवत डेरेदाखल झालेले अजित पवार, तर दुसरीकडे महत्त्वाचे नेते गमावलेले शरद पवार. राज्यात दोन पवारांविरोधात अटीतटीचा सामना रंगणार असे वाटत असताना जागावाटपाच्या पहिल्या फेरीत शरद पवार यांनी बाजी मारली. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शरद पवार यांनी वाटाघाटीत आपल्या पक्षासाठी १० जागा मिळवल्या, तर अजित पवार यांना मात्र महायुतीकडून मिळालेल्या चार जागांवरच समाधान मानावे लागले. तसेच आणखी एक जागा त्यांनी रासपचे महादेव जानकर यांना परभणीसाठी सोडली.
निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी पातळी न सोडता प्रचार करत अतिशय शिस्तबद्ध वाटचाल सुरू ठेवली. तसेच, पक्षफुटीची सहानुभूती शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांना मिळावी, याची खबरदारी घेतली. दुसरीकडे, बारामतीमध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवल्याने अजित पवार यांना आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कुठेही जाता आले नाही. पहिल्या टप्प्यापासून तिसऱ्या टप्प्यापर्यंत ते बारामतीमध्येच तळ ठोकून होते. त्यानंतर त्यांनी केवळ शिरूर या मतदारसंघासाठीच प्रचार केला, याचा जोरदार फटका पक्षाला बसला.
रायगड वगळता एकही जागा राष्ट्रवादीला जिंकता आली नाही. रायगडच्या विजयाचे श्रेय सुनील तटकरे यांनी आखलेली रणनीती, मतदारसंघात केलेला आक्रमक, पण नियोजनबद्ध प्रचार याला द्यावे लागेल, तर विरोधक अनंत गीते यांच्याविषयी असलेली जनसामान्यांतील काहीशी नाराजीही तटकरे यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. महादेव जानकर परभणीत एका लाख ३७ हजार मतांनी पिछाडीवर होते.
दुसरीकडे शरद पवार यांनी बारामती जिंकविण्यासाठी दशकांचे वैर विसरून मतदारसंघातील घराण्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित केले, तर माढा लोकसभेतही मोहिते-पाटील घराण्याला आपल्या बाजूला वळविण्यात यश मिळवले. तसेच विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निलेश लंके यांना अजित पवार यांच्या पक्षातून खेचून उमेदवारी दिली आणि त्यांनीही विजयाची ‘तुतारी’ वाजवली. दिंडोरीत भास्कर भगरे आणि वर्ध्यात अमर काळे यांनीही कमाल दाखवत विजयी आघाडी घेतली.
शरद पवार यांचे स्थान पुन्हा मजबूत
शरद पवार यांच्या उमेदवारांसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षाने जोरदार काम करत एकगठ्ठा मते पारड्यात टाकल्याने त्यांचा विजय सुकर झाला, तर याच्या उलट अजित पवार यांना महायुतीची साथ कुठेतरी कमी मिळाल्याचे दिसून आले. घवघवीत यशाने शरद पवार यांचे राजकारणातले स्थान पुन्हा मजबूत झाले असून, अजित पवार यांच्या पक्षाला मात्र यापुढील वाटचाल कशी करायची याचे मंथन करावे लागणार आहे.