महायुती-आघाडीत थेट लढत, मुंबईतील सहाही मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आज थेट लढत होत आहे. यापैकी महायुतीत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी तीन तर आघाडीत शिवसेना (उबाठा) चार आणि काँग्रेस दोन जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत उमेदवार उभे केले आहेत.भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मुंबईतून पीयूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तिकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात थेट सामना आहे. उत्तर पूर्व अर्थात, ईशान्य मुंबईत भाजपच्या मिहिर कोटेचा यांना शिवसेना उबाठाचे संजय दिना पाटील यांचे आव्हान आहे. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम अशी चुरशीची लढत अपेक्षित आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. तर दक्षिण मुंबईत शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत आणि शिवसेनेचे यामिनी जाधव यांच्यात थेट लढत होईल.
Sanjay Raut : शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदास संजय राऊतांचाच विरोध, दादा-तटकरेंवर उगाच खापर, राष्ट्रवादी चिडली

धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होत आहे. ‘एमआयएम’ने उमेदवार न दिल्याने आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने धुळ्यातील लढत चुरशीची ठरली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भास्कर भगरे यांना रिंगणात उतरविले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष कायम असल्यामुळे दिंडोरीची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक झाली आहे.

नाशिकमध्ये शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे उमेदवार असले तरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघावरही दावा सांगितला होता. त्यामुळे गोडसे यांना उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत राहावे लागले. आता गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी नाशिकमध्ये अक्षरशः प्रचारवारी केली. येथे शिवसेना उबाठाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमधील लढत सर्वाधिक लक्षवेधी आहे.

पालघरमध्ये तिरंगी लढत

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला असला तरी भाजपचे डॉ. हेमंत सावरा, शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या तिरंगी लढतीचा लाभ कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे.
संसदेत ‘आवाज’ कुणाचा? मुंबई, ठाणेकरांचा आज कौल; राज्यातील १३ मतदारसंघांचे भवितव्य होणर मतयंत्रात बंद

सांबरेंच्या उमेदवारीने भिवंडीत रंगत

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे असे तीन प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भिवंडीतील लढत रंगतदार झाली असून येथील कुणबी मते कुणाकडे झुकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

कल्याणमध्ये डॉ. शिंदे यांना दरेकर यांचे आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून शिवसेना उबाठाच्या वैशाली दरेकर-राणे यांनी आव्हान दिले आहे. डॉ. शिंदे यांच्या तुलनेत दरेकर या कमजोर उमेदवार मानल्या जातात. मुख्यमंत्री शिंदे यांची कल्याण लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा लक्षात घेता कल्याणचा गड सर करणे ठाकरे गटासाठी आव्हानात्मक मानले जाते.

ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे यांनी येथून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उबाठाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना रिंगणात उतरविले आहे. गेली अनेक वर्ष ठाणे लोकसभा मतदारसंघ हा युतीचा गड आहे. १९९६पासून ही जागा शिवसेनेकडे आहे. आता शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणता गट ठाण्यात बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.