लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमती झाली होती. मनसेने महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. आता लोकसभा निवडणूक पार पडली असून, त्याचा निकाल बाकी आहे. मात्र, त्याआधीच राज्यात मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक होत आहे.
यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, येथून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचे नाव निश्चित मानले जाते. मात्र, राज ठाकरे यांनी पानसे यांचे नाव घोषित करून भाजपची अडचण केली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. ‘मुंबई शिक्षक मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार वर्षांपासून या मतदारसंघाची बांधणी केली आहे. उमेदवारीबाबत मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली असून मला उमेदवारी मिळेल,’ असा विश्वास असल्याचेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कोण, कुणाला झटका देणार?
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भले महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची भाजप साथ सोडेल, अशी परिस्थिती आहे. याबाबत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनीच स्पष्टता आणली आहे. ‘कोकण पदवीधर मतदारसंघ आमचा हक्काचा आहे. निरंजन डावखरे येथील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे भाजप ही निवडणूक लढवणार असून, मनसेला शुभेच्छा,’ असे शेलार यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. त्यामुळे आता कोण कुणाला झटका देणार याची चर्चा रंगली आहे.