महायुतीत एकाकी पडल्यानं अजितदादा बॅकफूटवर; ‘लहान भाऊ’ होण्यास तयार; जागावाटपात मोठी माघार?

मुंबई: लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदेसेनेच्या काही नेत्यांनी लोकसभेतील पराभवासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भाजप अजित पवारांची साथ सोडणार का, याची चर्चा सुरु झाली. पण भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतची युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणूक होईपर्यंत तरी ही युती कायम असेल.

भाजपचे अनेक पदाधिकारी अजित पवारांचा लोकसभेत भाजपला काय उपयोग झाला, उलट नुकसानच झालं, अशी मांडणी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. भाजपचे पदाधिकारी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल उघड भूमिका घेऊ लागले आहेत. पुणे, सातारा, परभणी, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला नाहीच. उलट महायुतीला तोटा झाला, असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत भाजपच्या कोअर टिमची बैठक झाली. त्यात अजित पवारांसोबतची युती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लोकसभेत मुसंडी, पण आता चिंता वाढली; महाविकास आघाडीला सतावतेय भीती; राज्यात मध्यप्रदेश रिपीट?
राज्य भाजपचं नेतृत्त्व आणि अजित पवारांमध्ये काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली. त्यात अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीला कमी जागा लढवण्याची तयारी दर्शवली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी विधानसभेला २८८ पैकी ६५ ते ७० जागांवर समाधान मानण्याची तयारी दर्शवली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’लं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अजित पवार विधानसभेच्या जागावाटपात बॅकफूटला गेल्यास भाजप, शिंदेसेना आणि मित्रपक्षांना २१८ ते २२३ जागा लढवता येतील. शिंदेसेना १०० जागांसाठी आग्रही आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे १०५ उमेदवार निवडून आले होते.
Maharashtra Monsoon Budget 2024: ३ सिलेंडर फ्री, योजनांना वाढीव निधी, २५ लाख लखपती दिदी; अजितदादांकडून ताईंसाठी मोठ्या घोषणा
पुणे जिल्हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. गेल्याच आठवड्यात पुण्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात उघड भूमिका घेतली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘अजित पवारांना सोबत घेतल्याचा आपल्याला काहीच फायदा झाला नाही. उलट राष्ट्रवादीला सोबत का घेतलं, असे प्रश्न मतदार आम्हाला विचारु लागले. त्यामुळे मतदारसंघात मतदारांचा सामना करणं आम्हाला जड जातंय. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा कोणताच उपयोग झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी, अशी मागणी मी करतो,’ अशा शब्दांत चौधरींनी त्यांची भूमिका मांडली.