विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बारामती येथे जनसन्मान रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून अजित पवार गटाने मोठे शक्तिप्रदर्शन करून विधानसभेसाठी तयार असल्याचेच सांगितले. या रॅलीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय बनसोडे, खासदार सुनेत्रा पवार, नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे, नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
बारामतीमधून फोन गेला, बैठकीला जाऊ नका!
अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी वाचून दाखवून समाजातील सर्व घटकांना न्याय दिल्याचा दावा करून लाडकी बहीण योजना घराघरात पोहचविण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. पावसामुळे अजित पवार यांनी आधी भाषण करून शेवटी छगन भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आरक्षणप्रश्नावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली त्याबद्दल आम्ही आतापर्यंत त्यांचा जयजयकार करत आलो. परंतु सध्या महाराष्ट्रात मराठा-ओबीसी वर्ग आपसांत आरक्षणप्रश्नावरून भिडत असताना सामंजस्याने तोडगा काढून न्याय देण्याची भूमिका असायला हवी. अशावेळी संपूर्ण महाविकास आघाडीला बैठकीला दांडी मारण्यास का सांगावे? बैठकीच्या संध्याकाळी ५ वाजता बारामतीतून कुणाचा फोन गेला? असे सवाल विचारून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
तुमचे पाठीमागून सल्ले म्हणजे महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग
मराठा ओबीसी आरक्षणावरून दोन समाज आपसात लढत असताना हा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? तुमचा अजित पवार यांच्यावर किंबहुना माझ्यावर राग असेल, पण ओबीसी बांधवांनी तुमचे काय घोडे मारले आहे? तुमचे पाठीमागून सल्ले म्हणजे महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग आहेत, अशी गंभीर टीका भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केली.