याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाकड परिसरात असणाऱ्या खिवसरा शाळेतील मतदान केंद्रावर ईएमव्ही मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते सचिन भोसले यांनी केला. त्यानंतर भोसले हे मतदान केंद्रावर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणायचे काम करत होते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. कर्मचाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून निवडणूक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी सचिन भोसले यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना लगोलग जामीनही दिला. या प्रकारामुळे वाकड परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांचे स्पष्टीकरण
सचिन सुरेश भोसले हे नागु बारणे प्रशालेचा मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले असता बाहेरून त्यांनी मोबाईल मागून घेऊन मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावलेले आहे, याबाबतचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून नमूदवेळी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणल्याने, सचिन सुरेश भोसले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना कायदेशीर अटक करून न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.