‘मटा नाट्यमहोत्सवा’ला हाऊसफुल्ल प्रतिसाद; दोन दिवस मिळणार नाटकांची पर्वणी

मुंबई : हशा, टाळ्या, उदंड प्रतिसाद, हाऊसफुल्ल नाट्यगृह, प्रोत्साहन, कौतुक आणि शाबासकीची थाप, अशा मिश्र भावना विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या सभागृहात अनुभवायला मिळाल्या. निमित्त होते ‘मटा कॅलिडोस्कोप’अंतर्गत आयोजित ‘मटा नाट्यमहोत्सवा’चे. आर्केड ग्रुपच्या सहकार्याने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६३व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने यंदाच्या कॅलिडोस्कोप उपक्रमाची शुक्रवारी सुरुवात झाली.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, साधना बहुलकर, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुहास पिंगळे, आमदार पराग अळवणी, ज्योती अळवणी, लोकप्रिय नाट्यकर्मी प्रशांत दामले, कविता लाड, साठ्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष उदय तारदाळकर उपस्थित होते. या मान्यवरांसह उपस्थित रसिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला शुभेच्छा दिल्या.

कॅलिडोस्कोपअंतर्गत महामुंबई परिसरामध्ये विविध साहित्यिक, सांस्कृतिक, कलाविषयक, वैज्ञानिक अशा विविध कार्यक्रमांचा जागर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाट्यप्रयोगाने तितक्याच दणक्यात झाली. दीनानाथ नाट्यगृहामध्ये या नाटकाचा ६९१वा प्रयोग रंगला. प्रशांत दामले यांचा हा १२ हजार ९००वा प्रयोग होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या या विस्तारत्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे स्वागत या कार्यक्रमामध्ये डॉ. पिंगळे, बहुलकर आणि अळवणी यांनी केले.

मी १८ जून १९६२चा अंक वाचलेला आहे, असे सांगत, डॉ. पिंगळे यांनी या कार्यक्रमात ‘मटा’च्या जुन्या आठवणींना उजळा दिला. संगीत, नाटक, चित्रकला अशा विविध क्षेत्रांमधील बातम्या, समीक्षण या माध्यमांतून ‘मटा’ने लोकांची सांस्कृतिक जडणघडण केली, अशी प्रशंसाही त्यांनी केली. या वृत्तपत्राने मला चित्रकलेच्या कथा, व्यथा आणि क्षोभही व्यक्त करायला संधी दिली, असे सांगत बहुलकर यांनी ‘मटा’शी असलेले ऋणानुबंध उलगडले. ‘मटा’ घरातील वर्तमानपत्र आहे, अशा शब्दांमध्ये अळवणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी माध्यम प्रायोजक म्हणून असलेल्या भूमिकेद्वारे ‘मटा’ खरोखरच मित्र भासतो, असेही ते म्हणाले.

Code Of Conduct : मान्सूनपूर्व कामांसाठी आचारसंहिता शिथिल? राज्याला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता
‘महाराष्ट्र टाइम्स’ ६३ वर्षांचा होत असला, तरी तो जसा मोठा होत आहे, तसा तरुण होत आहे, अशा भावना व्यक्त करत दामले यांनी ‘मटा’ला शुभेच्छा दिल्या. गोविंदराव तळवलकरांपासून संपादकीय वाचायला सुरुवात केल्याचे सांगत या संपादकीयने जीभेवर आणि विचारांवर संस्कार केल्याचे ते म्हणाले. संपादकीयमुळे विचार स्वच्छ आणि निरोगी राहतात, असे सांगतानाच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने तटस्थपणे केलेल्या पत्रकारितेचेही त्यांनी कौतुक केले. या प्रत्येक वक्त्याने केलेले कौतुक आणि त्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट हा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी दिलेल्या पसंतीची पावतीच होती.

आज
आमने सामने – २५ मे, दुपारी ४ वाजता
प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली

उद्या
नियम व अटी लागू – २६ मे, दुपारी ४ वाजता
गडकरी रंगायतन, ठाणे