व्हॅलीमध्ये उडी मारली, आणि…
याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्वप्निल धावडे हे आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत मिनी घाटातील प्लस व्हॅली येथे गेले होते. त्यांनी तिथे व्हॅलीमध्ये उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की, त्यांना त्याचा अंदाज आला नाही. या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच स्वप्निल वाहून गेले. आज सकाळी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे असणाऱ्या देवकुंडजवळ यांचा मृतदेह सापडला आहे.
स्वप्निल हे भोसरी परिसरातील धावडे वस्ती येथे अनेक वर्षांपासून राहत होते. ते आई-वडिलांना एकुलते एक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्लस व्हॅलीतील घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांची मुलगी प्रत्यक्ष तिथे उपस्थित होती, अशी माहिती समोर आली आहे.
स्वप्निल धावडे हे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जिम आणि पोहण्याचं ट्रेनिंग देण्याचे काम करत होते. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाहून गेल्यानंतर दोन दिवसानंतर स्वप्निल यांचा मृतदेह मिळाला असून पोलिसांकडून माणगाव वरून हा मृतदेह पुण्यात आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
बॉक्सिंगमधील राष्ट्रीय खेळाडू
बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून गावडे यांनी नावलौकिक मिळवला होता. ते भारतीय सैन्य दलात सामील झाले होते. सर्विस केल्यानंतर मागच्या वर्षीच ते निवृत्त झाले होते. ते बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्या जोरावर सैन्य दलात त्यांनी नोकरी मिळवली होती. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने भोसरी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, स्वप्निल धावडे यांच्या पत्नी रश्मी धावडे यांना दहा मीटर पिस्तूल आणि पंचवीस मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळाले होते. त्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सन्मानदेखील करण्यात आला होता. रश्मी धावडे या पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये कार्यरत आहेत.